देशांतर्गत होणाऱ्या सर्वोच्च पातळीवरील निवडणुका म्हटल्या की कोणते सरकार येणार आणि त्यांची आर्थिक नीती काय असणार यावरून देशातील तसेच परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या दृष्टीने निवडणुका आणि संभाव्य निकाल म्हणजे अतिशय राजकीय अस्थिरतेची वेळ समजली जाते. या परिस्थितीत बऱ्याच गुंतवणूकदारांचा कल ‘वेट अँड वॉच’चा असतो. मात्र, भारतीय शेअर बाजारात मात्र ऐन निवडणुकांच्या काळात भलतीच सकारात्मकता संचारली आहे. एका सत्राचा अपवाद वगळता मागील सलग 10 सत्रात भारतीय शेअर बाजार कमालीचा तेजीत व्यवहार करत आहे.
आज मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स 269.43 अंशांनी वाढून 38,024 वर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 83 अंशांनी वाढून 11,426 वर स्थिरावला. 1 मार्च ते 15 मार्च या कालावधीत सेन्सेक्स 36,063.81 वरून 38,254.77 वर पोचला होता. तर, निफ्टी देखील ६०० अंशांनी वाढला आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारातील देशी आणि परकी गुंतवणुकीचा विचार करता परकी गुंतवणुक चढ्या स्वरूपाने वाढत आहे. चालू महिन्यात 1 मार्चपासून परकी गुंतवणूकदारांनी 62,721 कोटी रुपये गुंतवले आहेत. तर, 47,913 कोटी रुपये काढून घेतले आहेत. तर दुसरीकडे, भारतीय गुंतवणूकदारांनी मात्र गुंतवणूक काढून घेण्यावर भर दिला आहे. 1 मार्च ते 15 मार्च या कालावधीत भारतीय गुंतवणूकदारांनी 31,768.24 कोटी रुपये गुंतवून 38,616.88 कोटींचे शेअर्स विकले आहेत.

अभिप्राय द्या!

Close Menu