गुंतवणुका पूर्ण करा 

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, विमा हप्ते, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस), मुदत ठेव, गृह कर्जाचा हप्ता वगैरेंमधील गुंतवणूक ३१ मार्चपूर्वी केल्यासच ती आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी ग्राह्य़ धरली जाते. शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका. सुट्टीचा दिवस, चेक वटण्यास लागणारा विलंब वगैरे कारणांमुळे गुंतवणुकीची तारीख १ एप्रिल किंवा त्यानंतर पडल्यास वजावट या वर्षी मिळणार नाही. ही वजावट पुढील वर्षी घ्यावी लागेल. उदा. जीवन विमा हप्ता मार्च २०१९ मध्ये देय असेल आणि विमा हप्ता एप्रिल २०१९ मध्ये भरला असेल तर त्याची वजावट आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये घेता येणार नाही. शिवाय विलंब शुल्क भरल्यास त्याची वजावट मिळत नाही. गुंतवणूक वेळेत न केल्यास जास्त कर भरावा लागू शकतो. याशिवाय घाईघाईने केलेली गुंतवणूक आपल्यासाठी योग्य असेलच असे नाही. काही प्रकारच्या गुंतवणुका मुदतीपूर्वी न केल्यास दंड भरावा लागू शकतो. उदाहरणार्थ, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत किमान ५०० रुपये जमा करावे लागतात आणि इतकी गुंतवणूक न केल्यास दंड भरावा लागतो.

मेडिक्लेम विमा हप्ता वेळेत भरा

‘कलम ८० डी’नुसार मेडिक्लेम विमा हप्त्याची आणि ५,००० रुपयांपर्यंत वैद्यकीय तपासणीची वजावट घेता येते आणि ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांचा मेडिक्लेम विमा नाही, अशांना वैद्यकीय खर्चाची ५०,००० रुपयांपर्यंत वजावट घेता येते. मागील वर्षांपर्यंत वैद्यकीय खर्चाची वजावट फक्त अति-ज्येष्ठ नागरिकांना (ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे) घेता येत होती, ती आता सर्व ज्येष्ठ नागरिकांना (ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे) घेता येईल. ज्या करदात्यांनी विमा हप्ता भरला नसेल त्यांनी तो ३१ मार्च २०१९ पूर्वी भरावा. करदात्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की विमा हप्ता किंवा वैद्यकीय खर्च रोख स्वरूपात (५,००० रुपयांपर्यंतची वैद्यकीय तपासणी खर्च सोडून) केल्यास या कलमानुसार वजावट मिळत नाही.

गुंतवणूक पुरावे (पगारदारांसाठी)

जे पगारदार आहेत अशा करदात्यांचा संपूर्ण उत्पन्नावर भरावा लागणारा कर, उद्गम कर (टीडीएस) म्हणून कापण्याची जबाबदारी, ही मालकाची असते. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी मालकाला करदात्याच्या उत्पन्नावर अचूक कर (टीडीएस) कापावा लागतो. यासाठी करदात्याने केलेली प्रत्यक्ष गुंतवणूक आणि खर्च विचारात घ्यावा लागतो. देय कराची गणना वेळेत होण्यासाठी, गुंतवणुकीचे पुरावे सादर करण्याची मुदत बऱ्याचदा जानेवारी किंवा फेब्रुवारीमधील एखादी तारीख असते, जेणेकरून ३१ मार्चपूर्वी अचूक कर कापता येईल.

अभिप्राय द्या!