तेजीच्या लाटेवर स्वार भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी सप्ताह, महिना तसेच वित्त वर्षांची अखेर वाढीसह केली. सप्ताह तुलनेत एक टक्का, महिन्यात ८ टक्के, वित्तीय वर्षांत १७ टक्के वाढ मुंबई निर्देशांकाने वाढ नोंदविली आहे.

२०१८-१९ या चालू वित्त वर्षांतील सेन्सेक्स तसेच निफ्टीचा प्रवास गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम राहिला. या दरम्यान मुंबई निर्देशांक १७.३० टक्क्यांनी तर निफ्टी १४.९३ टक्क्यांनी वाढला आहे. जागतिक भांडवली बाजारातील उत्साही वातावरण येथेही दिसले. बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे सत्र झाले. तर शुक्रवारी सप्ताह, मासिक व चालू वित्त वर्षांतील अखेरच्या सत्राचे व्यवहार झाले. ३०, ३१ मार्चला अनुक्रमे शनिवार, रविवार असल्याने व्यवहार १ एप्रिलला होतील.

सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांक वाढ नोंदविताना सेन्सेक्स १२७.१९ अंश वाढीसह ३८,६७२.९१ पर्यंत झेपावला. व्यवहारातील त्याचा ३८,७४८.५४ हा सत्रातील वरचा टप्पा ठरला. मुंबई निर्देशांकाने ३८,६७५ या वरच्या टप्प्यावरच बाजाराची व्यवहार सुरुवात केली.

अर्धशतकी निर्देशांक वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ११,६०० पुढे गेला. ५३.९० अंश वाढीने निफ्टी ११,६२३.९१ वर बंद झाला. सप्ताहअखेरचा त्याचा प्रवास ११,५७० ते ११,६३० राहिला.

अभिप्राय द्या!

Close Menu