भारतीय शेअर बाजाराच्या घोडदौडीचा साक्षीदार आणि देशातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सला सोमवारी (1 एप्रिल) 40 वर्षे पूर्ण झाली. या काळात ईसीजी ग्राफप्रमाणे चढ उतार दाखवत 1979 साली 100 रुपयांपासून सुरु झालेला सेन्सेक्सचा प्रवास 39 हजारांच्या उच्चांकीवर येऊन पोचला आहे. म्हणजेच, जर 1979 साली 1 हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 3 लाख 90 हजार रुपये झाली असती किंवा जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्यावेळी 1 लाख रुपये गुंतवले असते तर तो आज 3 कोटी 90 लाख रुपयांचा मालक झाला असता. म्हणजेच सेन्सेक्स तब्बल 390 पटींनी वाढला आहे. 
 
अर्थात, 1979 साली सुरु झालेला शेअर बाजार मागील काही वर्षांपर्यंत श्रीमंत लोकांपुरताच मर्यादित होता. मात्र, आता सर्वसामान्य नागरिक देखील शेअर्स किंवा ट्रेडिंग बद्दल बोलू लागले आहेत. अनेकजण उत्पनाचा स्रोत म्हणून देखील शेअर बाजाराकडे वळले आहेत. या निमित्ताने मागील 40 वर्षात शेअर बाजारात झालेल्या स्थित्यंतराचा घेतलेला थोडक्यात आढावा. 
 
1979- मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सला सुरुवात. ( 100 रुपयांच्या मूळ इंमतीपासून कामकाजाला सुरुवात) 
 
1989- भारत सरकारने 1989 मध्ये सेबीची स्थापना केली. शेअर बाजाराच्या कार्यपद्धतीवर अंकुश ठेवण्यासाठी 1992 च्या कायद्यान्वये सेबीला अधिकार प्राप्त झाले. 
 
1990- सेन्सेक्स 1000 वर पोचला. 
 
1994- भांडवल बाजारात हर्षद मेहतासारखे जे घोटाळे होत होते ते होऊ नयेत म्हणून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 1994 मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कामकाजास प्रारंभ केला. यामुळे मुंबई शेअर बाजाराची मक्तेदारी संपुष्टात आली.
 
1995- सेन्सेक्स 5000
 
1995 – 1995 पासून ऑन लाईन ट्रेडिंगला सुरुवात झाली. (राष्ट्रीय शेअर बाजारातील सौदे नीट (एन. ई. ए. टी.) या पद्धतीद्वारे करण्यास सुरुवात झाली. 4 जानेवारी 1999 पासून एन. एस. डी. एल. व 15 जुलै 1999 पासून सी. डी. एस. एल.मध्ये सर्टिफिकेटच्या स्वरूपातील शेअर्सचे डीमॅटमध्ये रूपांतर होण्यास सुरुवात झाली. 
 
2006- सेन्सेक्स 10,000. 
 
2007 – परकी गुंतवणूकदारांचा वाढलेला ओघ आणि देशांतर्गत रिटेल गुंतवणूकदारांचा वाढता उत्साह यामुळे एकाच वर्षात सेन्सेक्स 10 हजारांवरून 20 हजारांवर. 
 
2008- अमेरिकेतील सबप्राईम संकट. अमेरिकेत लेहमन ब्रदर्स ही बलाढ्य बँक बुडाल्याने जागतिक पातळीवरील सर्वच शेअर बाजार कोसळले. याचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसून जानेवारी 2008 मध्ये 21 हजारांवर असलेला सेन्सेक्स ऑक्टोबर 2008 मध्ये 7,500 वर आला होता. 
 
2014- सबप्राईम संकटाला मागे टाकून सेन्सेक्स २५ हजारांवर. 
 
2017- सेन्सेक्स 30 हजार. 
 
2019 – 1 एप्रिल 2019 – सेन्सेक्स 39 हजार. 

अभिप्राय द्या!

Close Menu