भारतीय शेअर बाजारात मार्च महिन्यात सर्वाधिक परकी गुंतवणूक झाली आहे. मागील सात वर्षातील ही सर्वात मोठी परकी गुंतवणूक आहे. परकी गुंतवणूकदारांकडून आशियाई शेअर बाजारात करण्यात आलेल्या गुंतवणूकीतील सर्वात मोठा हिस्सा भारतीय शेअर बाजाराकडे आकर्षित झाला आहे. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांचा कल भारतीय शेअर बाजाराकडे आहे. त्यातच जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावल्या परिणामही इतर आशियाई बाजारांवर झाला आहे, त्याचाही फायदा भारतीय शेअर बाजाराला झाला आहे.
मार्च महिन्यात आशियातील दक्षिण कोरिया, तैवान, भारत, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यांच्या एकत्रित शेअर बाजारात 4.96 अब्ज डॉलरची परकी गुंतवणूक झाली आहे. तर एकट्या भारतीय शेअर बाजारात मार्च महिन्यात 4.89 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. फेब्रुवारी 2012 नंतरची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. परकी गुंतवणूकीच्या जोरावर सेन्सेक्स आणि निफ्टीने मागील महिन्यात जवळपास 7.7 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

अभिप्राय द्या!