अर्ली रिटायरमेंटचं सर्वात पहिलं आव्हान आहे ते पुरेसा निवृत्ती निर्वाहनिधी असणं. आपण साठीत रिटायर होतो तेव्हा पुढे साधारणपणे २०-२५ वर्षांच्या काळासाठी सोय करतो. परंतु जर रिटायरमेंट पन्नाशीत घ्यायची असेल, तर पुढे ३०-३५ वर्षांचा मोठा काळ लक्षात घ्यायला हवा.
साधारणपणे साठीपर्यंत कौटुंबिक जबाबदाऱ्या संपलेल्या असतात, त्यामुळे नंतर आरोग्याव्यतिरिक्त कुठलेही मोठे खर्च नसतात. पण आजकाल लग्न आणि मुलं दोन्ही उशिरा झाल्याने तसंही हे समीकरण बदलत चाललंय. त्यात जर मुलांचं शिक्षण, त्यांची लग्नं, स्वतचं घर असे सगळे खर्च रिटायरमेंटनंतर भागवावे लागले तर तारेवरची कसरत. जर व्यवस्थित आर्थिक नियोजन केलेलं नसेल तर पसे कमी पडण्याची शक्यता जास्त असते.
आर्थिक नियोजन करताना आपण काही अंदाज बांधून मग आकडेमोड करतो. परंतु दीर्घावधीसाठी अंदाज बांधताना कमी जास्त होऊ शकतं. तेव्हा ३०-३५ वर्षांसाठी नियोजन करताना सेफ्टी मार्जनि जास्त ठेवावं लागतं. उदाहरणार्थ, घरखर्च जर २५,००० रुपये असेल तर ३०,००० रुपये इतका धरावा आणि मग त्यावर महागाई लावावी.
जे कुणी नवीन व्यवसाय करू इच्छितात त्यांनी तर पहिला निर्वाह निधी बाजूला काढून, मग व्यवसायासाठी तरतूद करावी. शिवाय व्यवसायाला किती पसा लागणार यासाठी तर अजून चांगलं आर्थिक नियोजन व्हायला हवं. व्यवसायात यश मिळालं तर छान. परंतु काही कारणाने अपयश आलं तर किमान पुढच्या आयुष्यासाठी तरतूद आहे याची खात्री असणं महत्त्वाचं.
प्रत्येक व्यवसायात जोखीम ही आलीच. आणि उडी मारल्याशिवाय दुसरा पर्याय नसतोच. तेव्हा उडी मारायच्या आधी, आपल्याला पोहता येतं का? – हा प्रश्न नक्की विचारा. पुढचं पुढे बघू म्हणून सगळंच नशिबावर सोडू नका. ‘शक्य अशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर’ हे श्री गजानन महाराजांचे बोधवाक्य नेहमीच ध्यानात ठेवा आणि जोखीम कशी हाताळता येईल याचा पुरेपूर आढावा घ्या.
तुमच्या व्यवसायातील देयकांचा तुमच्या वैयक्तिक निधीवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घ्या. त्यानुसार तुमचं वैयक्तिक आणि व्यवसायाचं आर्थिक नियोजन करा. नाहीतर सगळं कमावलेलं गमवायची वेळ येऊ शकते!