छोट्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा ओघ सुरूच ठेवला आहे. मार्च महिन्यात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात 8,055.35 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मागील वर्षी याच कालखंडाशी तुलना करता त्यात 13 टक्क्यांची वाढ झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यात एसआयपीद्वारे 8,094 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
‘एसआयपीमध्ये आम्हाला सातत्याने वाढ होतानाच दिसते आहे. काही महिन्यांमध्ये जरी त्यात घट झालेली दिसली तरी ती नगण्यच आहे. नवीन एसआयपी खाती सुरू होण्यात मात्र खंड पडलेला नाही. मार्च महिन्यात तीन लाख नवीन एसआयपी खाती उघडण्यात आली आहेत’, असे मत अॅम्फीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस व्यंकटेश यांनी व्यक्त केले आहे.
मार्चअखेर म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक 23.80 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. एकूण गुंतवणूकीत सर्वसाधारणपणे 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. छोट्या गुंतवणूकदारांकडून केल्या जाणाऱ्या गुंतवणूकीतही मागील वर्षाशी तुलना करता 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात छोट्या गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक 10.01 लाख कोटी रुपये होती तर मार्चमध्ये हाच आकडा 10.73 लाख कोटी इतका होता.