2019-20 या चालू आर्थिक वर्षात प्रायमरी मार्केट म्हणजेच आयपीओला मागील तीन वर्षांच्या तुलनेत गुंतवणूकदारांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या मेट्रोपोलीस आणि पॉलिकॅब इंडियाला गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद देत 2,550 कोटींची उभारणी सहज शक्य झाली आहे.
मागील तीन वर्षांचा विचार करता एप्रिल 2017 मध्ये आलेल्या एस चांद अँड कंपनीने सर्वात जास्त म्हणजे 728 कोटींचा आयपीओ आला होता. त्यानंतर थेट जुलै 2018 मध्ये आयपीओच्या माध्यमातून 3,925 कोटींची उभारणी दोन कंपन्यांमध्ये मिळून झाली होती.
मागील काही दिवसात परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी दाखविलेल्या प्रतिसादामुळे भारतीय शेअर बाजारात जे साकारात्मकतेचे वारे आले आहे त्याचा प्रायमरी मार्केट म्हणजेच आयपीओला मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. कारण मागील वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आयएल अँड एफएस सारख्या एनबीएफसी कंपन्यांमध्ये तयार झालेल्या रोखतेच्या अभावामुळे संपूर्ण भारतीय शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला होता. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ पुढे ढकलले होते. मात्र, जानेवारी 2019 पासून परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारावर दाखविलेल्या विश्वासामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने नुकताच उच्चांक नोंदविला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu