शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून प्रामुख्याने दोन प्रकारचे उत्पन्न मिळते : १. लाभांश २. विक्रीतून किंवा हस्तांतरणातून मिळणारा भांडवली नफा या दोन्ही प्रकारच्या उत्पन्नाची कर आकारणी गुंतवणुकीच्या प्रकारावर अवलंबून असते.

लाभांश उत्पन्न : शेअर्सवरील लाभांश : कंपन्यांच्या शेअर्सवर एका आर्थिक वर्षांत मिळणारा लाभांश १० लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे. या रकमेपेक्षा जास्त मिळणाऱ्या लाभांशावर १० टक्के इतक्या दराने कर भरावा लागतो, करदात्याच्या कराचा स्लॅब कोणताही असला तरी. शिवाय या रकमेतून कोणतीही वजावट मिळत नाही. १० लाख रुपयांपर्यंतचा लाभांश करमुक्त असला तरी तो विवरणपत्रात ‘करमुक्त उत्पन्न’ या सदरात दाखवावा लागतो.
म्युच्युअल फंडावरील लाभांश : म्युच्युअल फंडावरील लाभांश हा करदात्यांसाठी करमुक्त आहे. मागील वर्षांपर्यंत इक्विटी फंडाला लाभांशावर कर आकारणी केली जात नव्हती, या वर्षांपासून या फंडाला १० टक्के लाभांश वितरण कर भरावा लागणार आहे. डेट फंडाला २८.३३ टक्के इतका लाभांश वितरण कर भरावा लागतो. करदात्यांसाठी मात्र लाभांश करमुक्त आहे. बऱ्याचदा करदाता म्युच्युअल फंड निवडताना लाभांश पुनर्गुतवणूक (लाभांश रिइन्व्हेस्टमेंट) हा पर्याय निवडतो. फंडाने जाहीर केलेला लाभांश हा गुंतवणूकदाराच्या बँकेत न येताच फंडातील युनिट्समध्ये गुंतविला जातो. हा लाभांश बँकेत जमा न झाल्यामुळे करदाता त्याच्या करमुक्त उत्पन्नात घेण्यास विसरतो. बँकेत जमा झालेला आणि फंडाने जाहीर केलेला आणि पुनर्गुतवणूक केलेला लाभांशसुद्धा विवरणपत्रात ‘करमुक्त उत्पन्न’ या सदरात दाखवावा लागतो.
विक्रीतून किंवा हस्तांतरणातून मिळणारा भांडवली नफा : कर आकारणीसाठी गुंतवणूक दोन प्रकारची समजली जाते. एक अल्प मुदतीची आणि दुसरी दीर्घ मुदतीची. ही मुदत गुंतवणुकीच्या धारणकाळावर अवलंबून असते.
शेअर्स आणि इक्विटी फंडातील युनिट्सची विक्री : शेअर बाजारात नोंदणीकृत शेअर्स आणि इक्विटी फंडातील गुंतवणुकीसाठी धारणकाळ १२ महिन्यांपेक्षा जास्त असल्यास ती गुंतवणूक दीर्घ मुदतीची होते, अन्यथा अल्प मुदतीची. या दीर्घ आणि अल्प मुदतीच्या गुंतवणुकीवर कर आकारणी अवलंबून असते.
दीर्घ मुदतीची भांडवली संपत्ती : मागील वर्षांपर्यंत शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांच्या शेअर्सची किंवा इक्विटी फंडातील युनिट्सची विक्री केल्यास आणि या विक्रीवर आणि काही खरेदीवर ‘एसटीटी’ (उलाढाल कर) भरलेला असल्यास होणारा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा करमुक्त होता. १ एप्रिल २०१८ नंतर विक्री केलेल्या अशा गुंतवणुकीवर होणारा नफा करपात्र करण्यात आला आहे. ज्या करदात्याने बऱ्याच वर्षांपूर्वी शेअर्स आणि इक्विटी फंडातील युनिट्स खरेदी केले होते, असे समजून की त्याच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा करमुक्त आहे आणि अचानक तो नफा करपात्र करण्यात आला. अशा करदात्यांचा या तरतुदीमुळे होणारा करभार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. भांडवली नफा गणण्यासाठी खरेदी किंमत ठरविण्याची नवीन पद्धत, एक लाख रुपयांपर्यंतचा नफा करमुक्त आणि बाकी रकमेवर फक्त १० टक्के इतका कर अशा सवलती देण्यात आल्या आहेत. १ एप्रिल २०१८ पासून प्राप्तिकर कायद्यात ‘कलम ११२ ए’ असे नवीन कलम जोडण्यात आले. या कलमानुसार शेअर्स आणि इक्विटी फंडावरील विक्रीवर होणारा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा करपात्र असेल आणि खालील अटींची पूर्तता केलेली असल्यास एक लाख रुपयांच्यापेक्षा जास्त भांडवली नफ्यावर १० टक्के इतका कर भरावा लागेल. म्हणजेच १ लाख रुपयांपर्यंतचा भांडवली नफा करमुक्त आहे.
शेअर्सच्या बाबतीत खरेदी आणि विक्री दोन्हीवर एसटीटी भरला गेला असला पाहिजे. परंतु काही प्रकारच्या खरेदी पद्धती ज्यावर एसटीटी भरला गेला नसला तरी या कलमानुसार सवलत मिळू शकते. उदा. २००४ पूर्वी खरेदी केलेले शेअर्स, बोनस शेअर्स, हक्कभाग, आयपीओ वगरे.

इक्विटी फंडाच्या बाबतीत फक्त विक्रीवर एसटीटी भरला गेला असला पाहिजे.

करदात्याला जास्त कर भरावा लागू नये म्हणून खरेदी किंमत ही खालीलप्रमाणे गणली जाते : शेअरची खरेदी १ फेब्रुवारी २०१८ पूर्वी केलेली असल्यास पुढील (१) आणि (२) मधील जास्तीत जास्त रक्कम भांडवली नफ्यासाठी खरेदी किंमत म्हणून समजली जाईल. (१) प्रत्यक्ष खरेदी किंमत किंवा (२) ३१ जानेवारी २०१८ रोजीचे जास्तीत जास्त बाजार मूल्य आणि विक्री किंमत यामधील जी कमी आहे ती रक्कम. ३१ जानेवारी २०१८ रोजी शेअर्सचे सौदे न झाल्यास त्याच्या आधीच्या दिवसाची किंमत विचारात घेतली जाईल. शेअरची खरेदी १ फेब्रुवारी २०१८ नंतर केलेली असल्यास प्रत्यक्ष खरेदी किंमत विचारात घेतली जाईल.

उदाहरण : एका गुंतवणूकदाराने जून २०१६ मध्ये शेअर बाजारात नोंदणीकृत कंपनीचे ८०० शेअर्स प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे शेअर बाजारामार्फत खरेदी केले (यावर एसटीटी भरला गेला आहे). त्याने हे ८०० शेअर्स जानेवारी २०१९ मध्ये १,००० रुपये प्रत्येकी किमतीला शेअर बाजारामार्फत विकले. या शेअर्सचे ३१ जानेवारी २०१८ रोजी मूल्य ७०० रुपये इतके होते. या व्यवहारावर भांडवली नफा आणि कर पुढीलप्रमाणे गणला जाईल :

हे शेअर्स खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यांनंतर विकल्यामुळे होणारा भांडवली नफा दीर्घ मुदतीचा आहे. शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीवर एसटीटी भरला गेला आहे, यामुळे ‘कलम ११२ ए’च्या तरतुदी लागू होतात. या शेअरची खरेदी किंमत खालीलप्रमाणे, जी सर्वात जास्त आहे :

प्रत्यक्ष खरेदी किंमत ८०० गुणिले ५०० =  ४,००,००० रुपये

३१ जानेवारी २०१८चे जास्तीत जास्त बाजार मूल्य ८०० गुणिले ७०० = ५,६०,००० रुपये आणि विक्री किंमत ८०० गुणिले १००० = ८,००,००० रुपये यामधील जी कमी आहे ती रक्कम म्हणजे ५,६०,००० रुपये.

या दोन्हींमधील ५,६०,००० रुपये ही खरेदी किंमत म्हणून विचारात घेतली जाईल. त्यानुसार दीर्घ मुदतीचा भांडवली नफा २,४०,००० रुपये (८,००,००० रुपये वजा खरेदी किंमत ५,६०,००० रुपये) इतका असेल. हा भांडवली नफा १,००,००० रुपयांच्या पेक्षा जास्त असल्यामुळे ‘कलम ११२ ए’नुसार करपात्र आहे. गुंतवणूकदाराला १ लाख रुपयांच्या वरील रकमेवर म्हणजेच १,४०,००० रुपयांवर १० टक्के इतका म्हणजे १४,००० रुपये कर भरावा लागेल.

दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी निवासी भारतीयांना आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना (एचयूएफ) कमाल करमुक्त मर्यादेचा फायदा घेता येतो. अनिवासी भारतीयांना हा फायदा घेता येत नाही. ‘कलम ८० सी’ ते ‘कलम ८० यू’ या कलमानुसारसुद्धा फायदा या भांडवली नफ्यातून घेता येत नाही. करदात्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, या कलमानुसार महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येत नाही.

अल्प मुदतीची भांडवली संपत्ती : इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी फंडातील युनिट्सच्या विक्रीचा, ज्यावर एसटीटी भरला आहे, यावर होणाऱ्या अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर १५ टक्के इतक्या सवलतीच्या दरात कर भरावा लागतो. अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी निवासी भारतीयांना आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना (एच.यू.एफ.) कमाल करमुक्त मर्यादेचा फायदा घेता येतो. अनिवासी भारतीयांना हा फायदा घेता येत नाही. ‘कलम ८० सी’ ते ‘कलम ८० यू’ या कलमानुसारसुद्धा फायदा या भांडवली नफ्यातून घेता येत नाही.
डेट फंडातील युनिट्सची विक्री : डेट फंडातील गुंतवणुकीसाठी धारणकाळ ३६ महिन्यांपेक्षा जास्त असल्यास ती गुंतवणूक दीर्घ मुदतीची होते, अन्यथा अल्प मुदतीची.
दीर्घ मुदतीची भांडवली संपत्ती : डेट फंडातील युनिट्सची खरेदी केल्या तारखेपासून ३६ महिन्यांनंतर विक्री केल्यास महागाई निर्देशांकाचा फायदा घेऊन खरेदी किंमत काढून भांडवली नफा गणावा लागतो. या भांडवली नफ्यावर २० टक्के इतक्या दराने कर भरावा लागेल. दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी निवासी भारतीयांना आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना (एचयूएफ) कमाल करमुक्त मर्यादेचा फायदा घेता येतो. क ‘कलम ८० सी’ते ‘कलम ८० यू’ या कलमानुसारसुद्धा फायदा या भांडवली नफ्यातून घेता येत नाही.
अल्प मुदतीची भांडवली संपत्ती : डेट फंडातील अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी, कर करदात्याच्या उत्पन्नाच्या स्लॅबप्रमाणे भरावा लागतो. अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी कमाल करमुक्त मर्यादेचा फायदा घेता येतो आणि ‘कलम ८० सी’ ते ‘कलम ८० यू’ या कलमानुसारसुद्धा फायदा या भांडवली नफ्यातून घेता येतो.
करदात्याने आर्थिक वर्षांत, म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च या काळात, केलेल्या व्यवहाराची नोंद ठेवून आपल्या विवरणपत्रात योग्य त्या सदरात दर्शविणे गरजेचे आहे. जे करदाते विवरणपत्र ऑनलाइन दाखल करतात त्याचा कर सॉफ्टवेअरद्वारे गणला जातो. करदात्याने उत्पन्नाची रक्कम चुकीच्या सदरात दाखविली तर करदात्याचे करदायित्व अचूक गणले जाणार नाही आणि त्याच्याकडून कमी किंवा जास्त कर भरला जाऊ शकतो. यासाठी करदात्याने योग्य ती खबरदारी घ्यावी.

पण काहीही शंका असल्यास आपल्या कारासाल्लागाराचा सल्ला घ्याच !!

अभिप्राय द्या!