मल्टि कॅप फंड म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडातील वैविध्यूपूर्ण गुंतवणूक.
यातील निधी हा विविध प्रकारच्या स्टॉकमध्ये गुंतवता येतो. सेबीच्या नियमानुसार मल्टिकॅपमधील किमान ६५ टक्के निधी हा इक्विटी वा इक्विटीशी संबंधित स्टॉकमध्ये गुंतवणे अनिवार्य आहे. या पोर्टफोलिओमध्ये लार्जकॅप, मिडकॅप व स्मॉलकॅप आदी सर्व प्रकारच्या स्टॉकचा समावेश असतो. मल्टिकॅपचे वैशिष्ट्य म्हणजे यातील गुंतवणूक ही वैविध्यपूर्ण म्हणजे सर्व प्रकारच्या सेक्टरमध्ये तसेच, बाजार भांडवलाच्या बाबतीत सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये केली जाते.
या फंडची शिफारस का केली जाते?
नजीकच्या भविष्यकाळात कोणत्या श्रेणीतील फंड चांगली कामगिरी करेल, हे ओळखणे गुंतवणूकदारासाठी अवघड असते. त्यामुळे लवचिक असणारे मल्टिकॅप फंड गुंतवणूकदारांसाठी सोयीस्कर ठरतात. फंड मॅनेजरना या फंडातील गुंतवणूक गरजेनुसार व बाजारातील परिस्थितीनुसार लार्ज, स्मॉल वा मिडकॅपमध्ये करता येते. उदा. मिड व स्मॉलकॅपमधील गुंतवणुकीचे मूल्य सातत्याने घटत असेल तर त्यातील गुंतवणूक ही लार्जकॅपमध्ये वळवता येते. केवळ लार्जकॅप फंडात गुंतवणूक केली तर त्यातील ८० टक्के निधी हा १०० शीर्षस्थ कंपन्यांमध्ये गुंतवावा लागतो. तसेच, मिडकॅपमधील ६५ टक्के निधी हा बाजार भांडवलात १०१ ते २५० स्थानावर असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवावा लागतो. मल्टिकॅपमधील गुंतवणूक मात्र लवचिक व सर्वसमावेशक असते.
मल्टिकॅपमध्ये कोणी गुंतवणूक करावी?
दीर्घकालीन म्हणजे १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा फंड सर्वांत फायदेशीर ठरतो. संपत्तीनिर्मितीसाठी लार्जकॅपच्या तुलनेत हा फंड अधिक चांगली कामगिरी नोंदवतो. वैविध्यपूर्ण गुंतवणुकीमुळे या फंडातून मिळणारा परतावा लक्षणीय असतो व निवृत्तीनंतरची तरतूद, मुलांचे उच्चशिक्षण आदी आर्थिक उद्दिष्टांसाठी तो उपयुक्त ठरतो. इक्विटी स्टॉकमध्ये स्वतंत्रपणे गुंतवणूक करू न इच्छिणाऱ्यांसाठीही हा फंड उत्तम आहे.