‘आयएल अँड एफएस’च्या पतनानंतर गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांची रोकड सुलभता आटली असून, परिणामी त्यांचे कर्ज वितरणही कमी झाले आहे. कर्ज वितरणातील ही पोकळी स्टेट बँकेसारख्या मोठय़ा बँका भरून काढत असल्याने नजीकच्या काळात बँकांच्या नफा क्षमतेत मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे बँकिंग समभागांवर केंद्रित म्युच्युअल फंडांची कामगिरीही चांगली राहण्याची शक्यता आहे.
कर्ज वितरणाचा मोठा हिस्सा दोन-तीन वर्षांपूर्वी बँकांकडून गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांनी आक्रमकरीत्या काबीज केला होता. त्याउलट काही अपवाद वगळता बहुतांश गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या कर्ज वितरणात मगील सहा महिन्यांत घट झाली आहे. तर वाणिज्य बँकांचे सुधारत असलेले कर्ज वितरण पाहता, बँकांच्या समभागात गुंतवणूक करणाऱ्या बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर फंडांतील गुंतवणूक नजीकच्या काळाला नफा मिळवून देण्याची शक्यता विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.
वर्ष २०१५ ते २०१८ दरम्यान गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ दिसली आहे. आयएल अँड एफएसचा घोटाळा उघडकीस आल्यापासून मात्र गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांचे मूल्यांकन रोडावले. दुसऱ्या बाजूला सरकारी बँकांच्या पुनर्भाडवलीकरणानंतर बँकांच्या कर्ज वितरणात वाढ झाल्याचे दिसून येते.