म्युच्युअल फंडाचे डिस्ट्रिब्युशन /विक्री करण्यासाठी लागणाऱ्या अँफीच्या ( म्युच्युअल फंड शिखर संस्था) परीक्षेत पास होऊन अधिकृत वितरक (एजेंट्स) बनण्यात महाराष्ट्रातील प्रोफेशनल्स आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. अँफीने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली असून आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये देशाच्या तुलनेत तब्बल 28.32 टक्के वितरक महाराष्ट्रातील आहेत.
म्युच्युअल फंड क्षेत्रात व्यवसाय करू पाहणाऱ्यांसाठी अँफीने एक नोंदणी प्रक्रिया ठेवली आहे. त्याअंतर्गत इच्छुकांना एक परीक्षा देऊन अधिकृत रजिस्ट्रेशन नंबर  (ARN ) मिळवावा लागतो. 2018-19 मध्ये एकूण 55,955 जणांना हा अधिकृत नंबर मिळाला आहे. यामध्ये संस्थात्मक पातळीवर व्यवसाय करणाऱ्यांची संख्या तब्बल 37,048 तर 17,625 वैयक्तिक /खासगी व्यावसायिक आहेत.
म्युच्युअल फंडांचा झपाट्याने वाढणारा आलेख पाहता अनेक व्यावसायिक या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. मात्र दुसरीकडे म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युशनमध्ये मिळणारे कमिशन (मोबदला) मागील वर्षांपासून कमी झाल्याने त्याचा फटका देखील या क्षेत्राला बसला आहे. 2018-19 मध्ये पहिल्या सहामाहीमध्ये 11 हजार वैयक्तिक व्यावसायिकांनी नोंदणी केली होती. मात्र, कमिशन मध्ये कपात झाल्यानंतर दुसऱ्या सहामाहीत नोंदणी घसरून 6,660 वर आली आहे.
राज्यांनुसार म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूशन रजिस्ट्रेशनमध्ये महारष्ट्रानंतर गुजरात (9.01) आणि उत्तर प्रदेशचा (6.99) क्रमांक लागतो.

अभिप्राय द्या!

Close Menu