माझ्या एका माहितीतील व्यक्तीने आमच्याच जवळच्या गावात एक वर्षापूर्वी ३५ लक्ष रुपयांना flat खरेदी केला व सहा महिन्यात तो flat  २० लक्ष रुपयांना विकायचा आहे अशी जाहिरातही दिली हे का झाले याची चौकशी करता तो flat चौथ्या मजल्यावर असल्याने आणि लिफ्ट नाही म्हणून गैरसोयीचा आहे हे समजले —–याला काय म्हणावे ??

म्हणून

घरखरेदी करताना

घर विकत घेण्याचा निर्णय झाला की सर्वप्रथम विचार करावा लागतो तो बजेटचा. त्यासाठी आपल्याजवळ शिलकी रक्कम किती उपलब्ध आहे याचा अंदाज घ्यावा. पुढल्या पाच वर्षात येणाऱ्या म्हणजेच मुलांचे शैक्षणिक  खर्च, घरातली लग्न, व इतर आणखी खर्चाचा अंदाज घेऊन शिलकी रक्कम ठरवावी. नंतर आपल्याला कर्ज किती उपलब्ध होईल याची कुठल्याही बँक/वित्तीय संस्थेत आपली इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे कागदपत्र दाखवून खात्री करून घ्यावी.

कुठल्याही वित्तीय संस्थेकडे बँकेकडे गेल्यावर त्यांच्याकडून पुढील संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे.

 • बँक, वित्तीय संस्था घराच्या खरेदी किमतीच्या किती टक्के कर्ज उपलब्ध करून देऊ शकते ती रक्कम किती असेल? कर्जाच्या व्यतिरिक्त आपल्या खिशातून डेव्हेलपरकडे भरायची रक्कम किती असेल?
 • बँक, वित्तीय संस्थेकडून आपण घेतलेल्या कर्जावर प्रतिवर्षाला किती टक्के व्याजदर आकारला जाणार आहे तसंच सदर व्याज आकारणीच्या पद्धती कुठल्या आहेत व त्यांची आकारणी प्रत्यक्ष कशा प्रकारे होते याबद्दल सविस्तर माहिती घ्यावी. प्रत्येक बँक,वित्तीय संस्थेकडे कर्जावरील व्याज आकारणीच्या बाबतीत बरेच पर्याय उपलब्ध असतात.
 • बँक,वित्तीय संस्थेच्या व्याजदरांची तुलना केवळ व्याजादराच्या आकड्यानुसार सात, आठ किंवा नऊ टक्के करणं फसवं ठरू शकतं. त्याऐवजी व्याजदराची आकारणी कुठल्या पद्धतीने होते ते पाहणं महत्वाचं ठरतं. त्यात पुढीलप्रमाणे पर्याय उपलब्ध असतात.
 • सरसकट दराने व्याज आकारणी
 • स्थायी व्याजदर आकारणी
 • तरल व्याजदर आकारणी
 • निश्चित व तरल व्याजदरांची मिश्र पद्धती

हल्ली घर कर्ज देण्यासाठी सर्व बँका, वित्तीय संस्थांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका, वितीय संस्था निरनिराळे पर्याय ग्राहकांसमोर आणतात. परंतु या प्रकारामधली पारदर्शकता आपल्याला कर्जाची रक्कम आणि मुदतीअंती  परतफेड करायची रक्कम याबाबत कागदावर आकडेवारी मांडल्यावरच लक्षात येते.

या पद्धतीच्या बाबतीत प्रतिदिन/ मासिक/ वार्षिक कटमिती यापैकी कुठल्या पद्धतीने व्याज आकारणी होणार आहे, याबाबत तसंच ठरलेल्या मासिक हप्त्यांपेक्षा जादा रकमेची आपण परतफेड केल्यास कीती दंड आकारणी होईल याची माहिती बँक,वित्तीय संस्थेकडून घेणे आवश्यक ठरते.

याप्रकारे प्रत्येक बँक, वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या माहितीनुसार आपल्याला भरायला लागणाऱ्या व्याजाच्या रकमेचं गणित मांडल्यावर कर्जमंजुरीसाठी लागणारे इतर खर्च मिळवावे व आपण कर्जापोटी घेतलेल्या रकमेवर सर्वात कमीत कमी परतफेड ज्या बँकेला, वित्तीय संस्थेला करावी लागणार असेल अशाच बँक किवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्याचं नक्की करावं.

घरखरेदीची पूर्वतयारी व नवीन बांधकामातल्या घराची खरेदी करायची असल्यास प्रकल्पाबाबत घ्यायची माहिती:

 • आपण घर खरेदीसाठी कागदावर मांडलेल्या बजेटप्रमाणे किती खोल्यांचं घर ( वन, टू, थ्री बीएचके ) आपल्याला विकत घेता येईल याचा आढावा घ्यावा.
 • आढावा घेताना शक्यतो पुढील १० ते १५ वर्ष आपल्या कुटुंबाला किती क्षेत्रफळाच्या जागेची गरज असेल याचा विचार करणं अत्यावशक असतं. म्हणजे घर पुन्हा पुन्हा बदलावं लागत नाही. अगदीच बजेटची अडचण असेल तर कमी जागेचा पर्याय स्वीकारणं अपरिहार्य असतं.
 • किती खोल्यांचं घर घ्यायचं हे ठरल्यावर आपल्या नोकरीधंद्याच्या दृष्टीने तसंच दैनंदिन सुविधा म्हणजे दुकानं, बाजार, बस स्टॉप जवळ असेल असं लोकेशन, एरिया ठरवून तिथे चौकशी सुरु करावी.
 • चौकशी करताना शक्यतो त्या भागात प्रत्यक्ष चालू असलेल्या बांधकामाच्या साईटवर जाऊन चौकशी करावी आणि सदर नियोजित इमारतीच्या, प्रकल्पाच्या प्लॅनसह संपूर्ण माहिती बांधकाम व्यावसायिकाच्या, विकासाच्या ऑफीसमधून घ्यावी. त्यात विक्रीस उपलब्ध असलेल्या घर तसंच इमारतीत /प्रकल्पात देण्यात येणाऱ्या सुखसोयी, तसंच घरात देण्यात येणाऱ्या सुखसोयीची माहिती दिलेली असते.

 सदर घराच्या ऐकूण किमतीविषयी पुढीलप्रमाणे माहिती विचारावी व ती  एका कागदावर व्यवस्थित लिहावी.

 •  घराचे एकूण विक्रीचे क्षेत्र व चटई क्षेत्र किती ?
 • घराचे प्रति चौरस फुट दराप्रमाणे होणारी एकूण विक्री किंमत किती ?
 • घराचा करारनामा नोंदण्यासाठी येणारा स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशनचा खर्च किती?
 • घराची नोंदणी करायची असल्यास आपल्याला बांधकाम व्यावसायिकाकडे किती रक्कम आगाऊ भरावी लागेल?
 • घराचा करारनामा नोंदणीच्या वेळी किती रक्कम भरायची आहे?
 • घराचा ताबा मिळेपर्यंत उर्वरित रकमेचे हप्ते कसे व किती रकमेचे असतील ?

घराच्या कायदेशीर बाबींविषयीसुद्धा बांधकाम व्यावसायिकाकडे पुढीलप्रमाणे चौकशी करावी.

 • इमारतीचा, प्रकल्पाचा नकाशा मनपा,स्थायिक स्वराज्य संस्थेकडून मंजूर झाला आहे का?
 • घर ज्या जमिनीवर बांधलं जाणार आहे त्या जमिनीची कागदपत्रं क्लिअर आहेत का?
 • घरास कुठल्याही बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज मंजूर होईल का जमिनीच्या कागदपत्रातल्या त्रुटींमुळे कर्जमंजूर न झाल्यास बांधकाम व्यावसायिकाकडून पैसे परत मिळण्याची हमी मिळेल का?
 • बांधकाम व्यावसायिकाने संपूर्ण प्रकल्पातील घरं तसंच गाळ्यांना कर्ज मिळण्यासाठी बँक/वित्तीय संस्थेकडून आगाऊ मंजुरी घेतली आहे का?

अशा प्रकारे पाच, सहा प्रकल्पांची माहिती घेऊन आपल्या आवाक्यातलं तसंच आपल्या अपेक्षेप्रमाणे असलेलं घर निवडून खरेदीचा निर्णय घेताना शक्यतो एकट्याने घेऊ नये.

या निर्णय प्रकियेत घरातल्या सर्वांचा सहभाग असल्यास उत्तम.                      

 

अभिप्राय द्या!