मुदत ठेव योजना, सोन्यातील गुंतवणूक, रियल इस्टेट सारख्या पारंपरिक गुंतवणुकीची साधने वाढत्या महागाई किंवा अव्वाच्या सव्वा किंमतींमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी उपयोगी ठरत नाहीत. तर दुसरीकडे, प्रचंड अस्थिरतेमुळे शेअर बाजारातील गुंतवणूक देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट असते. अशा वेळी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हुकमी एक्का ठरत आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे विशेष फायदे आहेत. त्याची थोडक्यात माहिती घेऊया.
तुम्हाला तज्ञांचे मार्गदर्शन मिळतं
प्रत्येक म्युच्युअल फंड हाउस त्यांचे फंड व्यवस्थापनेसाठी अनेक फंड मॅनेजर्स व फंड मॅनेजरला साहाय्य करण्यासाठी रिसर्च टीम व व्यावसायिक तज्ञ यांची नेमणूक करत असतात जे तुमच्यासाठी सतत आर्थिक बाजारपेठेवर लक्ष ठेवून असतात. ते विविध क्षेत्रातील आणि कंपन्यांमधील मार्केट ट्रेड्स व भावी संभाव्यता यांच संशोधन नियमितपणे करत असतात. आपले रिसर्च रिपोर्ट संबंधित स्कीमचे फंड मॅनेजरला सादर करत असतात त्यानंतर संबंधित फंड मॅनेजर तुलनात्मक अभ्यास करून गुंतवणुकीचा अंतिम निर्णय घेत असत या तज्ञांमुळे गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेता येत असतो. तसं तुम्हाला एकट्याने करणे कठिण होतं आणि म्हणूनच 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूकदार शेअर मार्केट मध्ये नुकसान सोसत असताना म्युच्युअल फंडाचे नियमित गुंतवणूकदार मात्र दीर्घ मुदतीत मोठा लाभ मिळवीत असतात.
कमी जोखीम
म्युच्युअल फंडाची खासियत म्हणजे त्यात गुंतवणुकीच्या अनेक संधी मिळतात. सामान्यपणे एकाच सिक्युरिटीतील गुंतवणूक ती कंपनी किती चांगला किंवा वाईट व्यवसाय करते यावर अवलंबून असते. पण म्युच्युअल फंडात तुम्ही रुपये ५००० गुंतवा अथवा रुपये पाच लाख गुंतवा त्यांतील थोडी थोडी रक्कम वेगवेगळ्या अनेक कंपन्यांचे शेअर्स मध्ये गुंतविली जात असते जेणेकरून तुमच्या गुंतवणुकीची जोखीम कमी होते.
तुम्हाला आवश्यक तेव्हा पैसे काढून घेण्याची सुविधा असते
ओपन एंडेड म्युच्युअल फंड योजना या बॅंकेतिल बचत खात्याप्रमाणे चालविता येत असतात म्हणजेच यात केव्हाही पैसे भरता येतात व केव्हाही काढता येतात. क्लोज एंडेड (बंद योजना) योजनेमध्ये केलेली गुंतवणूक काढण्यावर मात्र काही निर्बंध असतात आणि म्हणूनच बरेच तज्ञांशी सहमत होताना आम्हीसुद्धा ओपन एंडेड म्युच्युअल फंड स्कीम्स मध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत असतो.
कमीत कमी खर्च
तुम्ही इतर अनेक गुंतवणूकदारांसोबत गुंतवणूक करत असल्यामुळे तुम्हाला तुलनात्मकदृष्ट्या गुंतवणुकीचा खर्च कमी करावा लागतो. जर तुम्ही एकट्याने गुंतवणूक केली असती तर हा खर्च वाढला असता म्हणूनच भांडवली बाजारात थेट गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला कमी खर्च येतो.
पारदर्शकता
जमीनजुमल्यातील गुंतवणुकीत जे शक्य होत नाही ते यात शक्य होतं. यात गुंतवणुकीचे मूल्य रोजच्या रोज जाणून घेता येते शिवाय ठराविक काळानंतर बहुधा प्रत्येक महिन्याचे अखेरीला सर्वच फंड हाउसेस त्यांची फॅक्ट शिट प्रकाशित करत असतात जीचे आधारे तुम्ही म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक कोणकोणत्या कंपन्यांचे समभागामध्ये गुंतविली आहे. विविध प्रकारच्या अन्य कोणत्या ठिकाणी गुंतवणूका केलेल्या आहेत तसेच फंड मॅनेजरचे धोरणही तुम्ही ठरावीक कालावधीनंतर जाणून घेऊ शकता.
सेबी व अँफीचे नियंत्रण
सर्व म्युच्युअल फंड हे Security & Exchange Board of India (सेबी) आणि Association of Mutual Funds of India (AMFI) कडे नोंदणीकृत असतात आणि गुंतवणूकदारांचे हित सांभाळणा-या तरतुदी व नियमांनुसार काम करत असतात.

अभिप्राय द्या!