टाटा मोटर्सने मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत नफ्याची नोंद करत जबरदस्त कमबॅक केले आहे. टाटा मोटर्सने 1,117 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. कंपनीच्या महसूलात मात्र 4 टक्क्यांची घट झाली आहे. चौथ्या तिमाहीत टाटा मोटर्सला 86,422 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. कंपनीने डिसेंबरअखेर तिसऱ्या तिमाहीत तोटा नोंदवला होता. 
 
टाटा मोटर्सचा आलिशान कारचा ब्रॅंड असलेल्या जॅग्वार लॅंड रोवरच्या खालावलेल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर कंपनीला 26,993 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 2,125 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 
 
‘आमच्या देशातंर्गत व्यवसायाने बाजारातील परिस्थितीनुरुप लवचिकता दाखवली आहे. संशोधन आणि नाविन्य यावर भर देण्याचेच आमचे धोरण आहे. आम्ही बाजारातील आमच्या वाहनांचा हिस्सा आणि त्याचबरोबर नफासुद्धा वाढवला आहे. आमची टर्नअराऊंड 2.0 हे धोरण चांगलेच यशस्वी होते आहे. दिर्घकालीन यशासाठी आमचा व्यवसाय उभा राहतो आहे याची मला खात्री आहे’, असे मत टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी व्यक्त केले आहे.
 
दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजारात टाटा मोटर्सचे शेअर 189.50 रुपये प्रति शेअर या पातळीवर होते. कंपनीच्या शेअरच्या किंमतीत आज 7.15 टक्क्यांची वाढ झाली आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu