आर्थिक नियोजन करताना सर्वसाधारणपणे यादीत असणारी उद्दिष्टं म्हणजे – मुलांचे शिक्षण, मुलांची लग्न आणि निवृत्ती निधी. या सर्वाची तरतूद झाली की मग नंबर येतो तो गाडी, परदेश प्रवास किंवा एखादा खर्चीक छंद. सगळे मोठे खर्च पटकन असे डोळ्यासमोर येतात आणि त्यानुसार नियोजन सुरू होतं. अशा प्रकारच्या नियोजनातून काही छोटे परंतु वारंवार होणारे खर्च अलगद निसटून जातात. हे खर्च तसे वार्षकि यादीतसुद्धा मोडत नसल्याने त्यांचा विसर पडणं साहजिकच आहे. परंतु यांचा विचार वेळीच झाला तर त्यानुसार तरतूद करता येऊ शकते.
- घरातील विद्युत उपकरणे जसं की टीव्ही, वॉिशग मशीन, फ्रीज, मिक्सर, म्युझिक सिस्टीम, इत्यादी गोष्टींना एक वयोमर्यादा असते आणि त्यानुसार त्यांना बदलावं लागतं. काही वर्ष छोटी डागडुजी करून आपण त्यांची कार्यक्षमता वाढवतो, पण नंतर त्यांना बाय-बाय करावा लागतो. तेव्हा यांचाही विचार आर्थिक नियोजनात हवाच.
- प्रत्येक राहत्या घराला एका ठरावीक काळानंतर डागडुजीची गरज असते. मग यामध्ये रंगकाम, मॉडय़ुलर किचन, प्लंबिंग, फíनचर सगळंच आलं. हा सगळा खर्च एका वेळी करायचा म्हटला तर मोठा होतो आणि शक्यतो आपण सात-आठ वर्षांत किमान एकदा तरी हा खर्च करतो. कधी कधी तर घरात लग्नकार्य ठरतं तेव्हासुद्धा हा खर्च होतो. तेव्हा आर्थिक नियोजन करताना यालासुद्धा ध्यानात ठेवा.
- आपल्या पहिल्या गाडीसाठी आपण नियोजन करतो, पण त्यानंतरच्या गाडीचं काय? आपल्या वापरानुसार आणि आवडीनुसार जर आपण दर पाच वर्षांनी गाडी बदलणार असू तर मग त्याचंसुद्धा नियोजन करायलाच लागणार.
- काही कुटुंबामध्ये आजी-आजोबा वेगळ्या घरात राहतात. जरी त्यांचे नेहमीचे खर्च ते सांभाळत असले, तरी घरातील गरजांचे मोठे खर्च कदाचित त्यांना झेपणार नसतील आणि अशा खर्चाची तरतूद जर मुलांच्या आर्थिक नियोजनात नसली तर मग आयत्या वेळी जमवाजमव महागात पडते.
- भाडय़ाने दिलेल्या घरांनासुद्धा सांभाळावं लागतं. साधारणपणे पाच वर्षांतून एकदा तरी रंगकामाचा आणि प्लंबिंगचा खर्च होतो. शिवाय इमारत जर खूप जुनी असेल, तर संपूर्ण इमारतीचं काम काढण्यात येतं आणि त्याचा खर्च वाटून घेतला जातो. यासाठी एक नियमित रक्कम इमारत निधीच्या नावाखाली जमवायला काहीच हरकत नाही.
- नातलगांच्या लग्नात आहेराचा खर्चसुद्धा बऱ्यापकी होतो. त्यात जर बाहेरगावी लग्न असेल तर खर्च अजूनच वाढतो. कधी मोठं कुटुंब म्हणून खर्च होतो तर कधी मोजकं कुटुंब पण जवळचं नातं म्हणूनसुद्धा होतो. तेव्हा याचीसुद्धा दखल घ्यावी.
- जवळच्या नात्यात होणारे आपत्कालीन खर्च. अशा प्रकारच्या खर्चाना टाळतासुद्धा येत नाही आणि यांच्या परतफेडीचा अंदाज घेऊ शकत नाही.
हे सर्व खर्च होतात खरे पण किती किंवा कधी होतील याचा अंदाज बांधणं थोडं कठीण असतं. तेव्हा वरील प्रकारच्या खर्चासाठी एखादा फंड निवडून त्यात नियमित गुंतवणूक करावी.