नैसर्गिक वायू क्षेत्रातील पीएसयु कंपनी गेल इंडियाने 1:1 बोनस शेअरची ऑफर दिली आहे. गेल इंडियाने मार्चअखेरीस सरलेल्या चौथ्या तिमाहीत नफ्यामध्ये 20 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. नैसर्गिक वायूच्या विक्रीत आणि वितरणात वाढलेल्या मार्जिनचा फायदा कंपनीला झाला आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत गेलला 1,222.23 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 1,020.92 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. चौथ्या तिमाहीत गेलच्या महसूलात वाढ होत तो 15,430.69 कोटी रुपयांवरून 18,763.87 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेलच्या संचालक मंडळाने 1:1 बोनस शेअर देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यामुळे ज्या गुंतवणूकदारांकडे गेलचा एक शेअर असेल त्यांना गेलचा एक शेअर मोफत मिळणार आहे.
याचबरोबर कंपनीच्या संचालक मंडळाने 1.77 रुपये प्रति शेअरचा अंतिम लाभांश देण्याचासुद्धा प्रस्ताव दिला आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजारात गेल इंडिया लि. चा शेअर 347.90 रुपये प्रति शेअर या पातळीवर आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu