शेअर बाजारात इक्विटी / कॅपिटल मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ज्याप्रमाणे ‘आयपीओ’ला मागणी असते त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड गुंतवणुकीत ‘एनएफओ’ची (न्यू फंड ऑफर) मागणी वाढत आहे. म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या अँफीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये झालेल्या एकूण गुंतवणुकीत एनएफओ मार्फत झालेल्या गुंतवणुकीचा वाटा तब्बल 20 टक्के इतका राहिला आहे. मागील वर्षी इक्विटी म्युच्युअल फंडात एकूण 1.18 लाख कोटींची गुंतवणूक झाली. यापैकी इक्विटी योजनेच्या प्रारंभी म्हणजे ‘एनएफओ’ द्वारे तब्बल 25 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
मागील वर्षी एकूण 77 इक्विटी प्रकारातील योजना म्युच्युअल फंड कंपन्यांकडून सादर केल्या गेल्या आहेत. यामध्ये 70 पूर्णपणे इक्विटी, 3 बॅलन्स्ड आणि 4 इएलएलएस प्रकारच्या योजनांचा समावेश आहे. तर, यातील 47 योजना ओपन एंडेड प्रकारातील असून 22 योजना क्लोज एंडेड प्रकारातील आहेत.