रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देत रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएसच्या वेळेत वाढ केली आहे. आता आरटीजीएसच्या माध्यमातून संध्याकाळी उशिरापर्यंत पैसे पाठविता येणार आहे. आरटीजीएसच्या वेळेत दिड तासांची वाढ करण्यात येणार आहे. येत्या 1 जूनपासून वेळ वाढविण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.
 
सध्या आरटीजीएसमार्फत दुपारी साडेचारपर्यंत पैसे पाठविता येतात.  ‘आरटीजीएस’ या प्रणालीच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रक्कम हस्तांतर करता येते. आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) पद्धत सर्वसाधारणपणे देशातील केंद्रीय बँकांकडून वापरली जाते. मोठे व्यवहार आरटीजीएसमार्फत सुरक्षितरीत्या केले जातात. आरटीजीएस ही एक आर्थिक व्यवहाराची अशी पद्धत आहे की त्यात एका बँकेतून दुसर्‍या बँकेत आर्थिक हस्तांतरण होता वास्तविक वेळेत व्यवहार होतात. रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या वेळेतच अशा प्रकारचे व्यवहार पूर्ण होतात. 
 
रिझर्व्ह बँकेने निश्‍चित केलेल्या वेळेत आरटीजीएसचे व्यवहार केले जातात. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत आरटीजीएसमार्फत व्यवहार केले जातात. आता 1 जूनपासून संध्याकाळी 6 पर्यंत आरटीजीएस या प्रणालीच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रक्कम हस्तांतर करता येणार आहे. 

अभिप्राय द्या!