केंद्र सरकारने सोव्हेरन गोल्ड बॉंड्स गुंतवणूकीसाठी बाजारात आणले आहेत. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अक्षय तृतीयेला सुवर्ण रोख्यांना (सोव्हेरन गोल्ड बॉंड्स) बाजारात आणण्याची संधी सरकारने गमावली होती. त्यामुळे 15 टक्के प्रत्यक्ष करावर सरकारला पाणी सोडावे लागले होते. मात्र आता केंद्र सरकारने सोव्हेरन गोल्ड बॉंड्सची नवी सीरिज बाजारात आणण्याचे जाहीर केले आहे. सोमवारपासून हे बॉंड्स बाजारात उपलब्ध होतील. 
 
रिझर्व्ह बॅंकेबरोबर चर्चा करून केंद्र सरकारने गोल्ड बॉंड्सच्या किंमतीही निश्चित केल्या आहेत. 3,196 रुपये प्रति ग्रॅम या किंमतीने हे गोल्ड बॉंड्स गुंतवणूकीसाठी उपलब्ध होणार आहेत. जे गुंतवणूकदार ऑनलाईन अर्ज करणार आहेत आणि डिजीटल माध्यमातून बॉंड्समध्ये गुंतवणूक करणार आहेत त्यांना 50 रुपये प्रति ग्रॅमची सवलतसुद्धा देण्यात येणार आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बॉंड्सची किंमत 3,146 रुपये प्रति ग्रॅम इतकी असणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने यासंदर्भातील वेळापत्रकच जाहीर केले आहे. जून 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत प्रत्येक महिन्यात हे गोल्ड बॉंड्स गुंतवणूकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
 
गोल्ड बॉंड्सचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असणार आहे.
 
2019-20 सीरिज I      3 जून ते 7 जून 2019
 
2019-20 सीरिज II     8 जुलै ते 12 जुलै 2019
 
2019-20 सीरिज III    5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2019
 
2019-20 सीरिज IV     9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2019
एका आर्थिक वर्षासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराला वैयक्तिक पातळीवर गुंतवणूकीसाठी 4 किलोची कमाल मर्यादा असणार आहे. तर किमान 1 ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करता येता आहे. ऑनलाईन सेवेव्यतिरिक्त हे गोल्ड बॉंड्स शेड्युल्ड कमर्शियल बॅंका, नियोजित पोस्ट ऑफिसेस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे उपलब्ध असणार आहे. गुंतवणूककाळात गुंतवणूकदारांना वार्षिक 2.50 टक्के दराने निश्चित व्याज मिळणार आहे. मात्र व्याज दर सहा महिन्यांनी दिले जाणार आहे. गुंतवणूकीचा परतावा प्राप्तिकर कायदा,1961 च्या तरतूदींनुसार करपात्र असणार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu