शेअरवरील लाभांश हा शेअरच्या दर्शनी मूल्यावर (फेस व्हॅल्यू) दिला जातो. उदाहरणार्थ, एका नामांकित कंपनीच्या शेअरचा सध्याचा बाजारभाव 200 रुपये आहे (ज्याचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे), असे समजूया. अशा कंपनीने 30 टक्के लाभांश जाहीर केला तर मिळणाऱ्या लाभांशाची रक्कम 3 रुपये असेल. कारण शेअरचा बाजारभाव 200 रुपये असला तरी मिळणारा लाभांश हा त्या बाजारभावाच्या 30 टक्के नसून, दर्शनी मूल्याच्या (म्हणजेच 10 रुपयांच्या) 30 टक्के आहे, हे गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवले पाहिजे. गुंतवणूकदाराने तो शेअर 200 रुपयांना खरेदी केला तर मिळणारा 3 रुपये लाभांश हा त्याच्या गुंतवणुकीच्या फक्त दीड टक्का आहे. शेअर बाजाराच्या तांत्रिक भाषेत सांगायचे झाले तर या शेअरचा “डिव्हिडंड यिल्ड’ दीड टक्का आहे. “डिव्हिडंड यिल्ड’ जेवढा अधिक तेवढा संबधित शेअर लाभांशाच्या दृष्टीने जास्त फायदेशीर समजला जातो. काही शेअरचे दर्शनी मूल्य हे 10 रुपयांपेक्षा कमीदेखील असते. अशा शेअरवरील लाभांशदेखील त्यांच्या दर्शनी मूल्यावरच मिळतो.
शेअरवर मिळणारा लाभांश हा एका ठरावीक दिवशी (रेकॉर्ड डेट) गुंतवणूकदारांना मिळतो. त्या दिवशी ज्या गुंतवणूकदारांकडे तो शेअर असेल, त्यांना त्या लाभांशाचा लाभ मिळतो. मात्र, लाभांश मिळाल्यानंतर त्या शेअरचा बाजारभाव लाभांशाच्या रकमेएवढा कमी होतो. उदाहरणार्थ, आपण पाहात असलेल्या वरील उदाहरणात, 200 रुपये बाजारभाव असलेल्या या शेअरवर 3 रुपये लाभांश मिळणार आहे. हा लाभांश मिळाल्यानंतर या शेअरचा बाजारभाव 3 रुपयांनी आपोआप कमी होईल. शेअर बाजारातील अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणेमुळे हे काम अगदी सहज होते. या पद्धतीमुळे शेअर बाजारात फक्त अल्पकाळ येऊन लाभांशाचा फायदा घेऊन लगेच बाजाराबाहेर पडण्याचा एखादा गुंतवणूकदार विचार करीत असेल तर ते शक्य होत नाही. त्यासाठी त्याला तो शेअर थोडा तरी वर जाण्याची वाट पाहावी लागते. शेअर बाजाराच्या तांत्रिक भाषेत लाभांश मिळण्यापूर्वीच्या बाजारभावाला “कम डिव्हिडंड प्राइस’ म्हणतात, तर लाभांश मिळाल्यानंतरच्या बाजारभावाला “एक्स डिव्हिडंड प्राइस’ म्हणतात. जो गुंतवणूकदार “कम डिव्हिडंड प्राइस’ला शेअर खरेदी करतो, त्याला लाभांश मिळतो. परंतु जो गुंतवणूकदार “एक्स डिव्हिडंड प्राइस’ला शेअर खरेदी करतो, त्याला त्यावेळचा लाभांश मिळत नाही. लाभांश जाहीर केलेल्या कंपन्यांनी “एक्स डिव्हिडंड प्राइस’ची तारीख कोणती जाहीर केली आहे, हे नव्या गुंतवणूकदारांनी बारकाईने पाहून शेअर खरेदी करावा.
वरील बाबींवरून नव्या गुंतवणूकदारांना असे वाटू शकते, की लाभांशाच्या रूपाने नेहमीच नगण्य फायदा मिळतो. मात्र, आपल्या गुंतवणुकीचे योग्य प्रकारे नियोजन करून आपण लाभांशाच्या स्वरूपात चांगला फायदा करून घेऊ शकतो. त्यासाठी चांगले “डिव्हिडंड यिल्ड’ असलेले शेअर शोधून काढावेत. बाजारभाव तुलनेने कमी असलेल्या शेअरवर अधिक टक्के लाभांश मिळत असेल, तर अशा शेअरचा “डिव्हिडंड यिल्ड’ चांगला येतो. तसेच, शेअर बाजार कोसळतो, तेव्हा उत्तम कंपन्यांचे शेअर कमी भावात उपलब्ध होतात. अशावेळी नियमितपणे लाभांश देणाऱ्या उत्तम कंपन्यांचे शेअर खरेदी केल्यास भविष्यात मिळणारा “डिव्हिडंड यिल्ड’ चांगला मिळतो. तसेच, चांगल्या कंपन्यांचे शेअर नियमितपणे खरेदी करीत राहिल्यास मिळणारी लाभांशाची रक्कम मोठी असू शकते. अशा कंपनीने बोनस शेअर दिल्यास भविष्यात त्या बोनस शेअरवरदेखील लाभांश मिळतो. थोडक्यात, दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक केल्यास लाभांशाचा खरा लाभ होतो.
एका आर्थिक वर्षात गुंतवणूकदाराला मिळणारे दहा लाख रुपयांपर्यंतचे लाभांशाचे उत्पन्न हे प्राप्तिकरातून माफ आहे. त्यावरील उत्पन्नावर मात्र 10 टक्के प्राप्तिकर द्यावा लागतो. उदाहरणार्थ, एका गुंतवणूकदाराला एका आर्थिक वर्षात वेगवेगळ्या भारतीय कंपन्यांकडून एकूण बारा लाख रुपये लाभांश मिळाला असेल, तर पहिल्या दहा लाख रुपयांवर कर आकारला जाणार नाही; परंतु त्यावरील दोन लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के म्हणजेच 20 हजार रुपये प्राप्तिकर द्यावा लागेल. हा कर गुंतवणूकदाराने स्वतः जमा करायचा असतो, कारण कोणतीही कंपनी लाभांश देताना उद्गम करकपात (टीडीएस) करीत नाही.