आर्थिक उत्पादनांचे वितरक आणि आर्थिक सल्लागार म्हणजे एकच असे वरवर वाटले तरी दोघांच्या कामाच्या स्वरूपात खूप फरक आहे.

दोघांमध्ये फरक काय?

आर्थिक उत्पादनांचे वितरक हे गुंतवणुकीबाबत सल्ला देत नाहीत, तर ते केवळ तुमच्यासमोर विविध आर्थिक उत्पादने ठेवतात. तुम्हालाच तुमची गरज ओळखून त्यानुसार निवड करावी लागते. त्याबदल्यात त्यांना संबंधित कंपन्यांकडून कमिशन मिळते. यामुळे बहुतांश वेळा त्यांच्याकडून ग्राहकाची खरी गरज काय आहे, हे पाहण्यापेक्षा आपल्याजवळ असलेल्या आर्थिक उत्पादनांची विक्री करण्याकडे लक्ष केंद्रीत केले जाते.

दुसरीकडे आर्थिक सल्लागार मात्र ग्राहकाची नेमकी गरज काय आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. आपल्या ग्राहकाची आयुष्यातील उद्दिष्टे काय आहेत, हे जाणून घेऊन, त्याच्या गरजांचा सखोल अभ्यास आणि विश्लेषण करून त्यानुसार आर्थिकदृष्ट्या सुरक्षित पद्धतीने कुठे व किती गुंतवणूक करायची याचा सल्ला ते देतात. एखाद वेळेस जर आर्थिक सल्लागाराकडे ग्राहकाच्या गरजेनुसार आवश्यक असे आर्थिक उत्पादन नसेल तर ते सरळ तो व्यवहार थांबवणे पसंत करतात. पण अनावश्यक उत्पादनाची विक्री करत नाहीत.

आवश्यक माहिती गोळा करण्यात त्यांना किती स्वारस्य आहे त्याचा विचार करा

सुयोग्य आर्थिक नियोजनासाठी संबंधित व्यक्तीच्या आर्थिक बाबीविषयी सर्वसमावेशक माहिती गोळा करणे गरजेचे असते आणि ही गरज ओळखणे तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनाची सूत्रे ज्याच्या हाती सोपवणार आहात, तो तुमच्या आकांक्षा, उत्पन्न, खर्च, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे, तुमच्या मालमत्ता, देणी, करदायित्व आदींविषयी प्रश्न विचारत आहे की नाही, ही सर्व माहिती जाणून घेण्यात त्याला स्वारस्य आहे की नाही, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

गुंतवणुकीतले धोके आणि परतावा यासंदर्भात चर्चा करण्याची तयारी असली पाहिजे

आर्थिक सल्लागार निवडतानाचा एक महत्त्वाचा निकष म्हणजे गुंतवणुकीतील संभाव्य धोके आणि त्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा यासंदर्भात त्याची तुमच्याशी चर्चा करण्याची तयारी कितपत आहे. एखाद्या उत्पादनाने आपल्या ग्राहकांना भूतकाळात किती भरघोस परतावा दिला, याचे उदात्तीकरण करण्याऐवजी एक चांगला आर्थिक सल्लागार धोका पत्करण्याची तुमची तयारी कितपत आहे हे जाणून घेईल, गुंतवणुकीवरील परताव्याविषयी तुम्हाला योग्य कल्पना देईल आणि त्याचबरोबर संबंधित गुंतवणुकीत अल्पकालीन आणि दीर्घकालीन धोके काय आहेत, याचीही तुम्हाला कल्पना देईल.

विविध आर्थिक उत्पादनांविषयी परिपूर्ण चर्चा करण्याची तयारी असणे महत्त्वाचे

विशिष्ट आर्थिक उत्पादन तुमच्या गरजेनुसार आहे का किंवा तुमच्या गुंतवणुकीची मूल्यवृद्धी करत आहे का, याची काळजी जो घेतो, तो तुमच्यासाठी आर्थिक सल्लागार म्हणून योग्य आहे. तुमच्या ज्या असंख्य गरजा असतात, मग ते निवृत्तीचे नियोजन असेल, संपत्तीची निर्मिती असेल, कर्जाची परतफेड असेल किंवा अन्य काही, या सर्व गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने जो उपलब्ध असलेल्या सर्व गुंतवणूक पर्यायांचा परिपूर्ण सारांश तुमच्यासमोर ठेवेल, अशा आर्थिक सल्लागाराची निवड करणे महत्त्वाचे आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे जुजबी माहिती असलेल्या माणसावर कधीच अवलंबून राहू नये !!

 

अभिप्राय द्या!