भारतात सध्या असे अनेक पालक आहेत की ज्यांची मुले ही शहरांमध्ये राहतात आणि वडील गावी निवृत्ती जीवनाचा आनंद घेत आहेत. मात्र अशा पालकांना जर ठराविक रक्कम नियमितपणे मिळावी असं त्यांच्या मुलांना वाटत असेल तर त्याची सोय एसबीआय म्युच्युअल फंडाने ‘एसडब्ल्यूपी-बंधन’द्वारे केली आहे.

एसबीआय म्युच्युअल फंडाच्या ‘बंधन’ या नावातून आपल्याला अंदाज येतो की आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. ज्या वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं. लहानपणीचे सर्व हट्ट पूर्ण केले. आता त्या प्रेमाची परतफेड नाही मात्र स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर ‘एसडब्ल्यूपी-बंधन’च्या माध्यमातून जबाबदारी पार पाडता येईल. मुलगा-मुलगी आपल्या आई-वडिलांपासून कितीही दूर असला तरी त्यांना नियमित पैसे मिळवून देण्याची सोया यातून करू शकतो.

‘एसडब्ल्यूपी-बंधन’ म्हणजे काय?
‘सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’ अर्थात ‘एसडब्ल्यूपी’ म्हणजे आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण ठराविक रक्कम आपल्या वडिलांच्या बँक खात्यात पाठवू शकतो. गुंतवणूकदार दर महिन्याला ठरवलेली एक विशिष्ट रक्कम विशिष्ट दिवशी वडिलांना सहज देऊ शकतो. म्हणजे वडील निवृत्त झाले असतील तरी दर महिन्यात जमा होणाऱ्या पगाराप्रमाणे मुलाने ठरवून दिलेली रक्कम ते मिळवू शकतात. शिवाय वडिलांना मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असणार आहे. सर्व भारतीय नागरिकांना या एसबीआय म्युच्युअल फंडाच्या ‘एसडब्ल्यूपी बंधन’ योजनेचा फायदा घेता येणार आहे.

कोणती कागदपत्रे लागणार?
वडिलांचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, गुंतवणूकदाराशी असलेले नाते; तसेच बॅंक खात्याचा पुरावा ही कागदपत्रे म्युच्युअल फंड कंपनीला देणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडामध्ये ‘केवायसी’ प्रकिया करणे गरजेचे असते. मात्र ज्यांना आपल्याला पैसे मिळवून द्यायचे आहेत त्यांच्या ‘केवायसी’ची गरज नसते. त्यामुळे आपण आपल्या वडिलांना ‘सरप्राईज’ देऊ शकतोय.

‘एसडब्ल्यूपी-बंधन’ करताना
– एसबीआय म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेमध्ये असलेल्या गुंतवणुकीतून ‘एसडब्ल्यूपी-बंधन’ करता येते.
– योजनेसाठी फंड ओपन एंडेड आणि ग्रोथ पर्याय निवडणे बंधनकारक आहे.
-किमान 12 महिन्यांसाठी व मासिक किमान 5000 रुपयांचा ‘एसडब्ल्यूपी’ आवश्‍यक
-‘एसडब्ल्यूपी-बंधन’ केंव्हाही रद्द करू शकता येते. मात्र पुढील हप्त्याच्या सात दिवस आधी कंपनीला सूचना देणे आवश्‍यक.

 

 

अभिप्राय द्या!