पीपीएफएएस म्युच्युअल फंडाने आपला नवा फंड बाजारात आणला आहे. ‘पराग पारिख टॅक्स सेव्हर फंड’ असे या नव्या फंडाचे नाव आहे. हा एक ओपन एंडेड इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्किम (ईएलएलएस) प्रकारातील फंड आहे. या फंडासाठी तीन वर्षांचा लॉक इन कालावधी आहे. इक्विटी प्रकारातील दिर्घकालीन गुंतवणूकीतून परतावा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवत हा फंड बाजारात आणण्यात आला आहे.

फंडाची ऑफर 4 जुलैला खुली होत असून 18 जुलै 2019 ही त्याची अंतिम तारीख आहे. या फंडात किमान 500 रुपयांद्वारे गुंतवणूक करता येणार आहे. 26 जुलैला हा फंड गुंतवणूकीसाठी पुन्हा एकदा खुला होणार आहे. निफ्टी 500 टीआरआय हा ‘पराग पारिख टॅक्स सेव्हर फंडाचा बेंचमार्क असणार आहे. राजीव ठक्कर, रौनक ओन्कार आणि राज मेहता या फंडाचे व्यवस्थापन करणार आहेत.

‘आम्हाला मागील काही वर्षांपासून ईएलएलएस प्रकारातील फंडासाठी मोठ्या प्रमाणावर विचारणा होत होती. मात्र योग्य वेळ येण्याची आम्ही वाट बघितली. आज आमच्या इक्विटी प्रकारातील योजनेत एक लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे नवा ईएलएलएस फंड आणण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे आम्हाला वाटते’, असे मत पीपीएफएएस म्युच्युअल फंडाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नील पराग पारिख यांनी व्यक्त केले आहे.

या फंडाद्वारे 80 टक्के रक्कम इक्विटी प्रकारात तर 20 टक्के रक्कम डेट प्रकार आणि मनी मार्केट प्रकारात गुंतवली जाणार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu