निवृत्तीनंतरचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न प्रत्येकापुढे असतोच. सरकारी पेन्शन वा अन्य आर्थिक आधार नसणाऱ्या असंघटित क्षेत्रातील नागरिकांना तर हा प्रश्न अधिक तीव्रतेने जाणवतो. केंद्र सरकारने अशा नागरिकांना डोळ्यांसमोर ठेवून २०१२मध्ये स्वावलंबन योजना सुरू केली होती. हीच योजना अटल पेन्शन योजना या शीर्षकांतर्गत व अधिक वैशिष्ट्यांसह २०१५पासून लागू करण्यात आली.

अटल पेन्शन योजनेविषयी अधिक

कोणत्याही भारतीय नागरिकास या योजनेमध्ये सहभागी होता येते. यासाठी इच्छुक खातेदाराचे किमान वय १८ असणे आवश्यक आहे. तसेच, वयाच्या ४०व्या वर्षापर्यंतच त्यात सहभागी होता येते. यात जमा झालेली रक्कम पेन्शनच्या माध्यमातून वयाच्या ६०व्या वर्षापासून मिळण्यास सुरुवात होते. म्हणजेच यात भरल्या जाणाऱ्या हप्त्यांचा कालावधी किमान २० वर्ष असणे आवश्यक आहे.

परतावा

६०व्या वर्षापासून दरमहा एक हजारच्या पटीत पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम या योजनेतून मिळू शकते. गुंतवणूकदाराला त्या प्रमाणात बचत करणे गरजेचे असते.

अंशदान

या पेन्शन योजनेमध्ये दरमहा किमान ४२ रुपये ते कमाल १,४५४ रुपयांपर्यंत पैसे भरता येतात. या योजनेत पैसे गुंतवण्यास वयाच्या कितव्या वर्षी सुरुवात केली जाते व निवृत्तीनंतर दरमहा किती रक्कम हवी आहे यानुसार दरमहा केल्या जाणाऱ्या अंशदानाचा आकडा निश्चित होतो. उदाहरणार्थ, १८ वर्षे वयाची एखादी व्यक्ती दरमहा ४२ रुपयांच्या अंशदानासह या योजनेत सहभागी झाली तर त्या व्यक्तीस ६०व्या वर्षापासून दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळेल व त्याच व्यक्तीने १२६ रुपयांचा हप्ता निश्चित केला तर त्याच्या दरमहा पेन्शनचा आकडा तीन हजार रुपये असेल.

सरकारचे योगदान 

या खात्यामध्ये सरकारतर्फेही योगदान दिले जाते. खातेदाराने वर्षभरात भरलेल्या एकूण रकमेच्या ५० टक्के किंवा एक हजार रुपये यापैकी कमी असलेली रक्कम सरकारतर्फे या खात्यात जमा केली जाते.

 लाभ 

या योजनेचे लाभ वयाच्या ६०व्या वर्षापासून मिळणे सुरू होत असले तरी अपवादात्मक स्थितीत वयाची साठी गाठण्यापूर्वीच या योजनेतून बाहेर पडता येते. या खातेदाराचे निधन झाल्यास अथवा त्याला असाध्य आजार जडल्यास या योजनेतून बाहेर पडता येते. या योजनेत सहभागी झालेल्यांना त्यांनी निश्चित केलेल्या रकमेनुसार दरमहा एक ते पाच हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळते. विशेष म्हणजे, या खातेदाराच्या निधनानंतर त्याच्या/तिच्या जोडीदारास त्याच प्रमाणात मासिक पेन्शन मिळते.

Leave a Reply