मल्टीबॅगर शेअरच्या शोधात गुंतवणूकदार नेहमीच असतात. असाच एक शेअर आहे ज्याने 10 वर्षात तब्बल 1,32,627 टक्के परतावा दिला आहे. पाईपच्या क्षेत्रातील अॅस्ट्रल पॉली टेक्निक (Astral poly technik) या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना छप्पर फाडके परतावा मिळवून दिला आहे. 
 
दहा वर्षांपूर्वी 01 जुलै 2009ला ज्यांनी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते त्यांच्या शेअरचे बाजारमूल्य आज 13.27 कोटी रुपयांवर पोचले आहे. या शेअरची किंमत 0.99 रुपये प्रति शेअरवरून 1279.90 रुपये प्रति शेअरवर पोचला आहे. मागील एका वर्षात अॅस्ट्रल पॉली टेक्निकच्या शेअरने 21.93 टक्के परतावा दिला आहे. तर हे वर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यत या शेअरने 15.03 टक्के परतावा दिला आहे. 
 
अॅस्ट्रल पॉली टेक्निकची आर्थिक कामगिरी
 
अॅस्ट्रल पॉली टेक्निक या कंपनीने मार्च 2019 अखेर सरलेल्या तिमाहीत 62.47 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीशी तुलना करता नफ्यात 4.36 टक्के घट झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 65.32 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीच्या विक्रीत 21.27 टक्क्यांची वाढ होत ती 774.70 कोटी रुपयांवर पोचली आहे. मार्च 2018 अखेर कंपनीची विक्री 638.82 कोटी रुपयांची होती. 
 
मागील दहा वर्षात कंपनीची आर्थिक कामगिरी सातत्याने सुधारत आहे. मार्च 2019 अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 2,507 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली होती. तर दहा वर्षापूर्वी मार्च 2010 अखेर कंपनीची निव्वळ विक्री 291.17 कोटी रुपये होती. पाईपबरोबर प्लंबिंग, ड्रेनेज, आगीपासून सुरक्षेसाठी लागणारी उपकरणे, इलेक्ट्रीक उपकरणे यासारखी उत्पादनांच्या व्यवसायात ही कंपनी सध्या आहे. कंपनीचे निर्मिती प्रकल्प आणि विक्री भारताबरोबरच जगभरातसुद्धा आहे.

अभिप्राय द्या!