बँकेच्या मुदत ठेवींना पर्याय असलेला हा फंड प्रकार रोकडसुलभता बाळगणाऱ्या कंपन्यांच्या गळ्यातील ताईत बनला असला तरी वैयक्तिक गुंतवणूकदारांचे या फंड प्रकाराकडे फारसे लक्ष गेलेले नाही. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांतच नव्हे तर फंड वितरकांमध्येसुद्धा रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांबाबत उदासीनता होती. त्यातच भारतात घडत असलेल्या वेगवेगळ्या एका मागोमागच्या रोखे मुदतपूर्तीनंतर परतफेडीबाबतच्या अनियमिततेने या उदासीनतेची जागा धिक्काराने घेतली आहे.

म्युच्युअल फंडांच्या प्रमाणीकरण/ फेरवर्गीकरणानंतर जे काही फंड प्रकार गुंतवणूकदारांना नव्याने उपलब्ध झाले, त्यात बँकिंग अँड पीएसयू डेट फंड हा एक फंड प्रकार आहे. बँकांच्या मुदत ठेवीच्या व्याजाइतके उत्पन्न आणि बँकेच्या बचत खात्याची रोकडसुलभता असलेला हा फंड प्रकार आहे. बँकेच्या मुदत ठेवींना पर्याय असलेला हा फंड प्रकार रोकडसुलभता बाळगणाऱ्या कंपन्यांच्या गळ्यातील ताईत बनला असला तरी वैयक्तिक गुंतवणूकदारांचे या फंड प्रकाराकडे फारसे लक्ष गेलेले नाही.

डेट फंडात दोन प्रकारचे धोके असतात. पहिला वेळेवर पैसे  परत न मिळण्याचा धोका ज्याला ‘क्रेडिट रिस्क’ असे म्हणतात आणि व्याजदर वाढण्याचा धोका ज्याला ‘डय़ुरेशन रिस्क’ असे म्हणतात. ज्या कोणी डेट फंडांची लज्जत चाखली आहे त्यांना ठाऊक असेल की अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड गुंतवणुकीत ‘डय़ुरेशन रिस्क’ शॉर्ट टर्म फंडातील ‘डय़ुरेशन रिस्क’पेक्षा कमी असते.

सध्या ‘बँकिंग अँड पीएसयू डेट फंड’ या फंड प्रकारात २१ फंड असून, १,००० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक मालमत्ता असणारे १२ फंड आहेत. या फंड गटाचा मागील एक वर्षांचा सरासरी परतावा ९.२५ टक्के, तर तीन वर्षांचा सरासरी परतावा ७.९२ टक्के आहे. हे फंड अधिकतर निधी बँकांच्या ‘सीडी’मध्ये किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे रोख्यांत गुंतवतात – गुंतवणूक केलेले रोखे बहुतेक ‘ट्रिपल ए’ पत धारण करणारे असून बहुतांश फंडांकरिता संपूर्ण पोर्टफोलिओ उच्च पत असलेल्या रोख्यांत गुंतवणूक केली आहे. हे सर्च रोखे रोकडसुलभ आणि कमी म्हणजे सरासरी तीन ते साडेतीन वष्रे मुदतपूर्ती शिल्लक असलेले असतात. या फंड गटात गेल्या १२ महिन्यांमध्ये सरासरी मुदत सुमारे दोन वष्रे होती. फंडांच्या गुंतवणुकीत आरईसी, पीएफसी, आयआरएफसी, नाबार्ड आणि सिडबीसारख्या केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांचे रोखे आहेत. या फंडांचे सक्रिय व्यवस्थापन केले जाते. उच्च पत आणि रोख्यांची मुदतपूर्ती होण्यास सरासरी १२ ते १८ महिन्यांचा कालावधी असल्याने हे रोखे अतिशय रोकडसुलभ आहेत.

या रोख्यांतील गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना दोन प्रकारे लाभ होतो. एक, रोख्यांवर देय असलेले व्याज, दुसरा लाभ हा रोख्यांच्या व्याजदर आणि मुदतीच्या सक्रिय व्यवस्थापनातून होणारा भांडवली लाभ होय. सध्याच्या परिस्थितीत व्याजदर कमी होत असल्याने या फंडांना रोख्यांच्या किमतीत वाढ होत असल्याने चांगला भांडवली लाभ मिळत आहे. या भांडवली लाभामुळेच फंडांचा मागील एका वर्षांचा परतावा ९ टक्क्यांहून अधिक आहे. बँकेच्या मुदत ठेवीधारकास मिळणाऱ्या व्याजापेक्षा या फंडातील एका वर्षांचा परतावा अधिक आहे.

हे फंड गुंतवणुकीत व्याज किंवा कर्जाच्या प्रकारची जोखीम घेत नसल्याने बँक मुदत ठेवधारकांना हा कर-कार्यक्षम पर्याय आहे.

अभिप्राय द्या!