नोकरी, व्यवसायाद्वारे कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या तरुण, तरुणींना बचत व गुंतवणुकीबाबत फारशी माहिती नसते. अशा नवगुंतवणूकदारांनी पुढील गोष्टी लक्षात घेऊन बचतीचा श्रीगणेशा करावा.
खर्चाचा आढावा 
आपल्या खर्चांवर नियंत्रण राखण्यासाठी व खर्चांचा मागोवा घेण्यासाठी बजेट निश्चित करणे आवश्यक असते. आपला सरासरी मासिक खर्च किती आहे व त्यातील किती रक्कम अनावश्यकपणे खर्च झाली आहे हे त्यातून लक्षात येते. सध्याच्या आधुनिक काळात यासाठी स्मार्टफोनमधील अॅप्सचाही वापर करता येतो.

१५ टक्के बचत 
एकूण उत्पन्नाचा पाचवा भाग म्हणजे  १५ / २० टक्के रकमेची बचत करण्याचा प्रयत्न करा. हे प्रमाण अनेकांना मोठे वाटेल. मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीला कौटुंबिक जबाबदारी व खर्चांचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे दरमहा एवढी रक्कम जमा होत गेल्यास काही वर्षांनी भरीव निधी निर्माण होईल. या निधीच्या साह्याने आपत्कालीन निधी, गुंतवणूक निधी, कर्जहप्त्यांसाठीची तरतूद करणे शक्य होईल. एवढेच काय, यातून विदेशी ट्रिपचेही नियोजन तुम्ही करू शकाल. दरमहा विशिष्ट रकमेची बचत केल्याने तरुणपणी आर्थिक शिस्तही लागते.

कर्जाची परतफेड 

शैक्षणिक कर्ज अथवा क्रेडिट कार्डचे पेमेंट बाकी असेल तर त्याची लवकरात लवकर परतफेड करा. नियमित बचत, अनावश्यक खर्चांना फाटा, तसेच, काही अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न यामुळेही कर्जांची लवकर परतफेड होऊ शकते.

 

आपत्कालीन निधी

कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आपत्कालीन निधी निर्माण करण्यासाठी नियमित बचत करा. अचानक नोकरी गमावणे, अनपेक्षित कौटुंबिक खर्च यावेळी हा निधी उपयोगी पडतो. हा निधी निर्माण करण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे आपल्या बचत खात्यामध्ये एकूण मासिक खर्चाच्या तीनपट रक्कम राखून ठेवणे.

गुंतवणूक 
प्रत्यक्ष गुंतवणुकीस सुरुवात करण्यापूर्वी आधी सांगितल्यानुसार बचतीचा पाया भक्कम करा. कमी वयापासून केलेली गुंतवणूक दीर्घकाळात अतिशय फायदेशीर ठरते. कारकिर्दीच्या सुरुवातीला जोखीम घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे खात्रीशीर व पूर्वेतिहास चांगला असणाऱ्या स्टॉकमध्ये इक्विटी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. यासाठी पुरेशी माहिती नसल्यास अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्या. याशिवाय, रिकरिंग, मुदत ठेवी, पीपीएफ, एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हे गुंतवणूक पर्यायही उपयुक्त आहेत.

करनियोजन 
केवळ बचत व गुंतवणूक करू नका. या संबंधी प्राप्तिकराचे काय नियम, तरतुदी, वजावटी आहेत याचीही माहिती घ्या. करबचत करण्यासाठी कुठे व किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे, याची माहिती यातून तुम्हाला मिळेल.

विमा

वैद्यकीय उपचारांवरील वाढता खर्च लक्षात घेता प्रत्येकाकडे मेडिक्लेम (आरोग्यविमा) असणे ही काळाची गरज आहे. यासाठी फॅमिली फ्लोटर प्लॅनचाही पर्याय आहे. यामुळे पूर्ण कुटुंबाला आरोग्यविम्याचे संरक्षण मिळते. याशिवाय, आयुर्विमा असणेही अनिवार्य आहे. आयुर्विमा घेताना टर्म प्लॅनला प्राधान्य द्या. आयुर्विम्यातील अन्य प्रकारच्या पॉलिसींमधून (मनी बॅक, एण्डोव्हमेंट वगैरे) परतावा दिला जातो. मात्र अन्य गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत हा परतावा कमी असतो. त्यामुळे आयुर्विमा घेताना टर्म विमाच घ्या. वय जेवढे कमी तेवढा विमाहप्ता कमी व विमाकवच अधिक हे लक्षात घ्या.

अभिप्राय द्या!