भारताची आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अॅंड महिंद्रा 8 ते 14 दिवसांसाठी आपले उत्पादन बंद ठेवणार आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीमुळे त्रस्त होत देशातील ऑटोमोबाईल कंपन्या एकामागोमाग एक उत्पादन बंद करण्याचे धोरण स्वीकारत आहेत. त्यात आता महिंद्रा अॅंड महिंद्रा या अग्रगण्य कंपनीची भर पडली आहे.
उत्पादन झालेल्या वाहनांची संख्या आणि बाजारपेठेतील मागणी यांचा ताळमेळ साधण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कंपनीच्या विविध उत्पादन प्रकल्पांमध्ये 8 ते 14 दिवसांच्या कालावधीसाठी उत्पादन बंद ठेवले जाणार आहे. कंपनीने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
उत्पादन प्रकल्पांमध्ये आणि विविध डिलरकडे असलेला प्रवासी वाहने आणि युटिलिटी वाहनांचा साठा नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे महिंद्रा अॅंड महिंद्राच्या वाहनांच्या बाजारातील उपलब्धतेवर कोणताही विपरित परिणाम होणार नसून बाजारांतील गरजेनुरूप पुरेसा साठा असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu