सिंगापूर स्टॉक एक्सचेंज आता गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये (गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक) कार्यान्वित होणार आहे. सिंगापूर स्टॉक एक्सचेंज (एसजीएक्स) आणि राष्ट्रीय शेअर बाजार, एनएसईला संयुक्तपणे काम करण्यासाठी सेबीकडून यासंदर्भातील परवानगी मिळाली आहे. निफ्टी इंडेक्स आणि एसजीएक्स हे संयुक्तपणे गिफ्टी सिटीत काम करणार आहेत. फ्युचर्स अॅंड ऑप्शन्समध्ये (एफ अॅंड ओ) हे व्यवहार होणार आहेत.
सेबीनंतर आता स्थानिक सरकारी यंत्रणांकडून परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी एसजीएक्स आणि निफ्टी यांचा ट्रेडिंगच्या संदर्भातील वाद न्यायालयात पोचला होता. निफ्टी हा भारताचा सर्वोच्च निर्देशांक आहे आणि तो जगभर व्यवहार करत असतो. मात्र दरम्यानच्या काळात देशातील व्यवहार परकी शेअर बाजारांकडे स्थलांतरित होत असल्याच्या भीतीमुळे निफ्टीने एसजीएक्स निफ्टीची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
परकी गुंतवणूकीवर कोणताही कर नसल्यामुळे गिफ्ट सिटी ही परकी शेअर बाजारांच्या व्यवहारांसाठीच असल्याची जाहिरात झाली आहे. नवे एनएसई इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर (आयएफएससी)- एसजीएक्स कनेक्टमुळे निफ्टीवरील नोंदणीकृत कंपन्यांचे व्यवहारही गिफ्ट सिटीत होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोकडची उपलब्धता होणार आहे. 2020च्या अखेरपर्यत या स्टॉक एक्सचेंजमधील व्यवहार सुरू होणार आहेत. दोन्ही स्टॉक एक्सचेंज आपसातील न्यायालयीन वाद मागे घेण्याचीही प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

अभिप्राय द्या!