जे गुंतवणूकदार अनेक वर्षांपासून शेअर बाजारातील “आयपीओ’साठी अर्ज करीत असतील, त्यांना आठवत असेल की एखाद्या कंपनीचा पब्लिक इश्‍यू बंद झाल्यानंतर सुमारे 21-22 दिवसांनी त्या शेअरची बाजारात नोंदणी (लिस्टिंग) होत असे. यामुळे भांडवलाची गरज असलेल्या संबंधित कंपनीला पैसे मिळण्यास उशीर होत असे आणि गुंतवणूकदारांचे पैसे सुमारे तीन आठवडे अडकून पडत असत. हा कालावधी कमी करण्याचा “सेबी’कडून सातत्याने प्रयत्न होताना दिसत आहे. एप्रिल 2010 पासून “सेबी’ने हा कालावधी 12 दिवसांवर, तर नोव्हेंबर 2015 पासून 6 दिवसांवर आणलेला आहे. यासाठी प्रामुख्याने “ऍस्बा’ (ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्‍ड अमाउंट) पद्धतीचा वापर करण्यात आला. “ऍस्बा’ पद्धतीत धनादेशाच्या (चेक) ऐवजी आपल्या बॅंक खात्याची माहिती अर्जात भरणे गरजेचे होते. परंतु, आता एक जुलै 2019 पासून “आयपीओ’साठीच्या अर्जात “पेमेंट मोड’ या सदरात “यूपीआय आयडी’ देणे सक्तीचे झाले आहे. 29 जुलै 2019 रोजी बाजारात दाखल झालेले “ऍफल इंडिया’ या कंपनीचा “आयपीओ’ या नव्या पद्धतीने झालेला पहिलाच “आयपीओ’ ठरला. येत्या तीन महिन्यांत किंवा पुढील पाच मोठे पब्लिक इश्‍यू या नव्या पद्धतीद्वारे यशस्वी झाल्यास “आयपीओ लिस्टिंग’चा कालावधी तीन दिवसांवर आणण्याचा “सेबी’चा विचार किंवा प्रयत्न आहे.
 
आयडी कसा मिळवायचा? 
आता वाचकांना प्रश्‍न पडणे साहजिक आहे, की “यूपीआय आयडी’ म्हणजे नक्की काय व तो कसा मिळवायचा? “यूपीआय’ (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) ही एका बॅंक खात्यातून दुसऱ्या बॅंक खात्यात मोबाईल ऍपद्वारे पैसे पाठविण्याची एक पद्धत आहे. सर्व मोठ्या बॅंकांनी आपल्या ग्राहकांसाठी “यूपीआय’ आधारीत “ऍप्स’ सुरू केली आहेत. त्यापैकी 46 ऍपद्वारे आपण “आयपीओ’साठी पेमेंट करू शकतो. या बॅंकांची नावे “सेबी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अशा बॅंकेचे “ऍप’ आपल्या मोबाईलमध्ये “डाउनलोड’ केलेले असल्यास व आपल्याकडे “यूपीआय आयडी’ व “यूपीआय पिन’ असल्यास तोच “यूपीआय आयडी’ व “पिन’ वापरून आपण “आयपीओ’चे पैसे भरू शकतो; अन्यथा “एनपीसीआय’द्वारे (नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) सुरू करण्यात आलेले “भीम’ ऍपही आपण वापरू शकतो. “भीम’ ऍपवर सध्या 115 बॅंका “ऍक्‍टिव्ह’ आहेत. “यूपीआय आयडी’ आपल्याकडे नसल्यास आपला मोबाईल नंबर बॅंकेकडे नोंदवून व आपले डेबिट कार्ड वापरून तो तुम्ही मिळवू शकता. “आयपीओ’साठी “थ्री इन वन’ खाते वापरणाऱ्यांना वेगळे काही करण्याची आवश्‍यकता नाही. 
 
“यूपीआय आयडी’ लिहिलेल्या आपल्या “आयपीओ’ अर्जाची छाननी पूर्ण झाल्यावर आपल्या मोबाईलवर “ब्लॉक मॅंडेट’ची विनंती येते. त्यामध्ये उल्लेख केलेली सर्व माहिती (अर्ज क्रमांक, कंपनीचे नाव, रक्कम आदी) बरोबर आहे ना, याची खात्री झाल्यावर “यूपीआय पिन’ वापरून आपल्याला पैसे “ब्लॉक’ करण्याची विनंती मान्य करावी लागते. कालांतराने शेअरच्या वाटपाची (ऍलॉटमेंट) प्रक्रिया पूर्ण झाल्याचे आपल्याला कळविण्यात येते. आपण अर्जाद्वारे मागितलेले सर्व शेअर मिळाले असल्यास तेवढी रक्कम आपल्या बॅंक खात्यातून काढून घेण्यात येते व न मिळालेल्या शेअरची रक्कम “अनब्लॉक’ करण्यात येते. 
गुंतवणूकदारांच्या पैशाचे “रोटेशन’ वाढण्यासाठी “सेबी’ सातत्याने प्रयत्नशील असताना, गुंतवणूकदारांनी नव्या पद्धतीची अथवा तंत्रज्ञानाची भीती न बाळगता भांडवली बाजाराला चालना दिली पाहिजे, असे वाटते.

अभिप्राय द्या!