बिगर बॅंकिंग वित्तीय क्षेत्रातील एका कंपनीने दहा वर्षात जबरदस्त 14,500 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 3 सप्टेंबर 2009ला या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवलेल्या 1 लाख रुपयांचे आज 1.49 कोटी रुपये झाले आहेत. फक्त दहाच वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ती कंपनी आहे बजाज फायनान्स. बजाज फायनान्स आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना खूपच मागे टाकले आहे.
याच कालावधीत महिंद्रा फायनान्शियलने 649.21 टक्के, चोलामंडलम फायनान्सने 669.65 टक्के, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सने 157.09 टक्के आणि मन्नापुरम फायनान्सने 508.3 टक्के परतावा दिला आहे. 3 सप्टेंबर 2009 ला बजाज फायनान्सच्या शेअरची किंमत 21.8 रुपये प्रति शेअर इतकी होती. आज राष्ट्रीय शेअर बाजारात बजाज फायनान्सचा शेअर 3276.50 रुपये प्रति शेअर या पातळीवर व्यवहार करतो आहे.
मागील वर्षभरात या शेअरने 17.45 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 2018 मध्ये कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत 28 टक्क्यांची वाढ झाली होती तर मार्च 2019 अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत 32 टक्क्यांची वाढ झाली आहे. बजाज फायनान्सकडून केल्या जाणाऱ्या कर्जवितरणात सरलेल्या आर्थिक वर्षात 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने सरासरी 81,000 रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीअखेर बजाज फायनान्सने नफ्यात 43 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीला 1,195 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 91,287 कोटी रुपयांवरून वाढून 1,28,898 कोटी रुपयांवर पोचली आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu