म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा अचूक मंत्र सापडल्याचे मागील तीन वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शेअर बाजार घसरल्यानंतर प्रामुख्याने इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मूल्य देखील कमी होते परिणामी शेअर बाजार गुंतवणूकदारांबरोबरच म्युच्युअल फंड गुंतवणूकदार देखील चिंताग्रस्त असल्याचे सर्वसाधारण चित्र असते. मात्र, शेअर बाजारातील घसरण हीच गुंतवणुकीची योग्य संधी म्हणत गुंतवणूक करणारे सुजाण गुंतवणूकदार एसआयपीच्या माध्यमातून आपली गुंतवणूक वाढवत असल्याचे अँफी-क्रिसिल ने सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
अहवालात एप्रिल 2016 ते जून 2019 च्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला आहे. या दरम्यानच्या कालावधीत एसआयपीच्या माध्यमातून 2.30 लाख कोटींची गुंतवणूक झाल्याचे आढळून आले. त्यात 2017 साली 43900, 2018 साली 67200 आणि जून 2019 पर्यंत 92700 कोटींची गुंतवणूक झाली आहे.
विशेष म्हणजे ज्यावेळी शेअर बाजारात घसरण झाली त्यावेळी एसआयपी गुंतवणुकीत वाढ झाल्याचे दिसून येते. उदा. ऑगस्ट 2016 ते डिसेंबर 2016 दरम्यान निफ्टी 1000 अंशांनी घसरला होता. त्यावेळी एसआयपी गुंतवणूक वाढली. अशीच काहीशी स्थिती जानेवारी 2018 ते एप्रिल 2018 आणि जुलै 2018 ते ऑक्टोबर 2018 मध्ये दिसून आली.