देशातील कॉर्पोरेट संस्थां म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना बँकिंग आणि पीएसयू फंड त्याचबरोबर कॉर्पोरेट बॉण्ड फंडाला पसंती देत असल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने डेट प्रकारातील ही गुंतवणूक असते. मागील काही महिन्यांमध्ये लिक्विडीटीचा मुद्दा समोर आल्यानंतर कमी जोखीम आणि उच्च प्रतीचे कर्जरोखे म्हणून या फंडांना वाढती मागणी आहे.
म्युच्युअल फंडाची शिखर संस्था अँफीने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते ऑगस्ट या या महिन्यात बँकिंग आणि पीएसयू फंडात सर्वाधिक म्हणजे 15,656 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. तर, त्याखालोखाल कॉर्पोरेट बॉण्ड फंडात 11,324 कोटी गुंतविले गेले आहेत. बँकिंग आणि पीएसयू फंडातील तब्बल 80 टक्के गुंतवणूक बँक, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सार्वजनिक वित्तीय संस्थांमध्ये करण्यात येते. तर, कॉर्पोरेट बॉण्ड फंड त्याच्या एकूण मालमत्तेपैकी कमीतकमी 80 गुंतवणूक एए + आणि त्यापेक्षा जास्त मानांकन असलेल्या कॉर्पोरेट बाँडमध्ये करतात.
डेट प्रकारात गुंतवणूक करण्यासाठी एकूण 16पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी, मनी मार्केट फंड, लिक्विड फंड आणि अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड यांना कॉर्पोरेट हाऊसेस कडून पसंती देण्यात येते.