मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आता “इंटरेस्ट रेट ऑप्शन्स कॉंट्रॅक्ट्स’ उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अशा प्रकारची कॉंट्रॅक्ट्स उपलब्ध करून देणारे “बीएसई’ हे भारतातील पहिले व एकमेव एक्स्चेंज ठरले आहे.
मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वांत जुना आणि सध्या जगातील सर्वांत वेगवान शेअर बाजार आहे. या बाजारात सहा मायक्रोसेकंद इतक्या वेगाने व्यवहार करण्यात येतात. या बाजारात समभाग व कर्जरोख्यांच्या खरेदी-विक्री व्यतिरिक्त चलन, सोने-चांदी यावर आधारित डेरिव्हेटीव्ह कॉंट्रॅक्ट्सचे व्यवहारही करण्यात येतात.
जानेवारी 2014 पासून या बाजारात इंटरेस्ट रेट फ्युचर्स कॉंट्रॅक्ट्सही उपलब्ध करून देण्यात आली होती. मुंबई शेअर बाजाराचा अशा प्रकारच्या व्यवहारातील सरासरी बाजारहिस्सा सुमारे 40 टक्के आहे. अलीकडेच म्हणजे 26 ऑगस्ट 2019 पासून “इंटरेस्ट रेट ऑप्शन कॉंट्रॅक्ट्स’ही “बीएसई’वर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही कॉंट्रॅक्ट्स सरकारी कर्जरोख्यांवर आधारित आहेत. सध्या तरी 768 जीएस 2023, 668 जीएस 2031, 717 जीएस 2028, 726 जीएस 2029, 795 जीएस 2032, 727 जीएस 2026, 757 जीएस 2033 ही कॉंट्रॅक्टस खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
इंटरेस्ट रेट ऑप्शन म्हणजे?
————–
आता “इंटरेस्ट रेट ऑप्शन’ म्हणजे नक्की काय व त्याचा उपयोग काय ते समजून घेऊया.
“इंटरेस्ट रेट ऑप्शन’ हे एक असे डेरिव्हेटिव्ह कॉंट्रॅक्ट आहे, की ज्याचे मूल्य रुपयातील व्याजदरावर अवलंबून असते. केंद्र सरकारला ज्या-ज्या वेळी पैशांची गरज पडते, त्या-त्या वेळी सरकार कर्जरोख्यांद्वारे पैसे उभे करते. अर्थव्यवस्थेतील व्याजदर सतत कमी-जास्त होत असतात. कर्जरोख्यांवरील व्याजदर व कर्जरोख्यांच्या किंमती यांचे नाते विषम असते; म्हणजेच जेव्हा व्याजदर वाढतो, तेव्हा कर्जरोख्यांच्या किंमती कमी होतात आणि व्याजदर जेव्हा कमी होतो, तेव्हा कर्जरोख्यांच्या किंमती वाढतात. यालाच “इंटरेस्ट रेट रिस्क’ असे म्हणतात आणि “इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्हज’मुळे ही “रिस्क मॅनेज’ करणे कर्जरोखेधारकांना शक्य होते. ही कॉंट्रॅक्ट्स, ज्यांच्याकडे सरकारी कर्जरोखे मोठ्या प्रमाणावर आहेत. उदा. बॅंका, फंड मॅनेजर यांना आपल्या पोर्टफोलिओचे “हेजिंग’ करण्यास उपयुक्त ठरतात. “हेजिंग’ म्हणजे एका बाजारात झालेले नुकसान दुसऱ्या बाजारातून भरून काढणे.
देशातील कर्जरोख्यांच्या बाजाराची व्याप्ती व खोली वाढविण्यासाठी रिझर्व्ह बॅंक व “सेबी’ या संस्था सतत प्रयत्नशील असतात. “इंटरेस्ट रेट ऑप्शन्स’ची सुरवात हा त्याचाच एक भाग आहे, असे म्हणावे लागेल.