नोकरीची चिंता, उत्पनातील घसरण आणि या परिस्थितीत खर्चाबाबतची जागरूकता यामुळे देशातील ग्राहकांचा आत्मविश्वास झपाट्याने घसरत असल्याचे आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे. ग्राहकांचा आत्मविश्वास मागील सहा वर्षांच्या नीचांकीवर पोचला आहे.
आरबीआयने शुक्रवारी जाहीर केलेल्या पतधोरणानुसार ग्राहकांची खरेदी करण्याची इच्छा आणि क्षमता यांचा समन्वय असलेला चालू परिस्थिती निर्देशांक (सीसीआय) जाहीर केला. यानुसार सप्टेंबरमध्ये हा निर्देशांक 89.4 होता. तर जुलै मध्ये 95.7 इतका होता. मागील सहा वर्षांचा विचार करता सप्टेंबर 2013 मध्ये तो 88 वर घसरला होता.
आरबीआय हा निर्देशांक मोजताना चालू आर्थिक परिस्थिती, रोजगार, किंमत पातळी, उत्पन्न आणि खर्च या पाच मुद्द्यांवर ग्राहकांचे सर्वेक्षण करते. देशाच्या विविध भागातील साधारणतः 5000 ग्राहकांचे सर्वेक्षण केले जाते.
या  सर्वेक्षणात दोन मुख्य निर्देशांक विचारात घेतले जातात. 1) चालू परिस्थिती निर्देशांक (सीसीआय) आणि भविष्यातील अपेक्षा निर्देशांक. मागील वर्षभरात घडलेल्या आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ग्राहकाला काय वाटते यावर चालू परिस्थिती निर्देशांक मोजला जातो. तर, भविष्यातील अपेक्षा निर्देशांकात पुढील वर्षभरातील अंदाज यांचा विचार केला जातो. जर हा निर्देशांक 100 पेक्षा जास्त असेल तर ग्राहकांचा आत्मविश्वास निर्देशांक सकारात्मक समजला जातो.

 

अभिप्राय द्या!