गेल्या दोन वर्षांत मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंड सर्वांत कमी किंवा “निगेटिव्ह’ परतावा देत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात आता असा विचार नक्कीच येत असेल, की ही मिडकॅप, स्मॉलकॅप फंडात केलेली गुंतवणूक बरोबर आहे ना? का यातील गुंतवणूक येईल त्या मूल्यांकनात विकून सरळ ते पैसे मल्टीकॅप अथवा लार्जकॅप फंडात ठेवावेत?
 
“निगेटिव्ह रिटर्न्स’मुळे चिंता 
———————- 
आता इक्विटी मुच्युअल फंडातील गुंतवणूक हा उत्तम पर्याय आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या गुंतवणूक प्रकाराबद्दलची जागरूकता गेल्या 3-4 वर्षांत अधिक झाली आहे. बऱ्याच लोकांनी यामध्ये गुंतवणूक चालूही केली असेल. ही गुंतवणूक करताना आपण लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप फंडांत विभागून करीत असतो. ही विभागणी अतिशय योग्य आहे. सुरवातीच्या काही काळात गुंतवणूकदारांना असे जाणवले असेल, की मिडकॅप, स्मॉलकॅप फंडात खूप चांगला परतावा मिळतो. पण गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना असेही जाणवले असेल, की तेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंड सर्वांत कमी किंवा “निगेटिव्ह’ परतावा देत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात आता असा विचार नक्कीच येत असेल, की ही मिडकॅप, स्मॉलकॅप फंडात केलेली गुंतवणूक बरोबर आहे का? का यातील गुंतवणूक येईल त्या मूल्यांकनात विकून सरळ ते पैसे मल्टीकॅप अथवा लार्जकॅप फंडात ठेवावेत? 
 
…तर गुंतवणूकदारांनो हे असे करू नये, असे ठाम मत आहे.
आपली मुच्युअल फंडातील गुंतवणूक ही लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप या तिन्ही प्रकारच्या फंडांत समान असावी. गेल्या दोन वर्षांत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. विशेषतः मिड आणि स्मॉल कॅपमध्ये लार्जकॅपच्या तुलनेत जास्त घसरण बघायला मिळाली. पण ही घसरण म्हणजे “बुल मार्केट’मधील एक “करेक्‍टिव फेज’ आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांत अशा प्रकारचे भरपूर चढ-उतार शेअर बाजारात पाहायला मिळाले आहेत. या वर्षांमध्ये तेजीची वर्षे कमी आणि मंदीची वर्षेच जास्त होती. मंदीची वर्षे म्हणजे हर्षद मेहता अथवा केतन पारेख घोटाळा उघडकीस आल्यानंतरची बाजारातील पडझड, सर्वांना ज्ञात असलेली 2008 मधील मोठी घसरण वगैरे. तरीसुद्धा काही चांगल्या मिडकॅप फंडात केलेली गुंतवणूक जर तशीच ठेवली असती, तर 2019 मध्ये साधारणपणे वार्षिक सरासरी परतावा 18 ते 19 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मिळाला असता.
 
 दीर्घ कालावधीसाठी मिड, स्मॉलकॅप फंडांत गुंतवणूक केली, तर हे फंड शेअर बाजाराच्या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा जास्त परतावा देतात. तेव्हा आता जरी मिड, स्मॉलकॅप फंडांतील गुंतवणूक गेल्या दोन वर्षांपासून “निगेटिव्ह’मध्ये दिसत असले तरी, यातून बाहेर पडू नये. आपला मुच्युअल फंड पोर्टफोलिओ हा लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप या सर्वांमध्ये समान विभागलेला असावा, जेणेकरून जोखीमही विभागली जाते आणि साऱ्या प्रकारची फळे चाखायला मिळू शकतात. 

अभिप्राय द्या!