आज जगभरात ‘वर्ल्ड सेव्हिंग डे’ साजरा केला जात आहे. चांगल्या जीवनमानासाठी उत्पन्नातून मिळालेल्या पैशाचा योग्य आणि विवेकी वापर करणे का गरजेचे आहे हे सांगणारा दिवस म्हणून याकडे पहिले जाते. वास्तविक भारत आणि पैशांची बचत हे दोन अगदी समानार्थी शब्द म्हणता येतील इतकी भारतात पैशांची बचत केली जाते. विशेषतः मागील काही काळापर्यंत तरी हे अगदी तंतोतंत खरे होते. मात्र आता तरुणांच्या आयुष्याविषयीच्या व्याख्या बदलत आहेत. महागाई वाढत आहे. भौतिक गोष्टींची मागणी वाढत आहे. अनावश्यक खर्च देखील वाढत आहेत. अशा वेळी बचतीकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. मात्र ते न टाळता येणारे आहे. 
पैसा बचतीची आवश्यकता
वाढत्या गरजांच्या संख्येमुळे शिक्षण, आरोग्य, निवारा, व्यवसाय, अपघात, बेकारी यांसारख्या काही नियोजनबद्ध तर काही आकस्मिक गोष्टींसाठी पैशांची बचत आवश्यक आहे. यासाठी आलेले सर्वच्या सर्व उत्पन्न वर्तमानकाळातच न खर्च करता, त्यातील काही भाग बचत म्हणून बाजूला काढून त्याची सुरक्षित वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे.
किती बचत करावी 
आपल्या किंवा कुटुंबांच्या गरजांच्या आवश्यकतेनुसार क्रमवारी लावून वर्तमानकाळात उत्पन्नातील काही ना काही हिस्सा किमान 30 टक्के उत्पन्न बचत करायलाच पाहिजे. ही 30 टक्के रक्कम दर महिन्यास बचत करण्यात आली, तर वर्षभरात निश्चितपणे चांगली रक्कम बचत करणे शक्य आहे.
बचत गुंतवणुकीची साधने
म्युच्युअल फंड :
अगदी 100 रुपयांच्या बचतीचा पर्याय असलेला म्युच्युअल फंड हा सर्वात प्रभावी पर्याय आहे. कारण या गुंतवणुकीत तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. विशिष्ट आर्थिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन जसे की शिक्षण, लग्न, रिटायरमेंट बचतीची रक्कम ठरविता येते आणि गुंतवणुकीचा वेळ भरपूर असल्याने चक्रवाढ व्याजाचा फायदा घेता येतो.
सुकन्या समृद्धी योजना 
प्रामुख्याने मुलींच्या भविष्याची तरतूद म्हणून ही योजना समोर आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास साधारणतः 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर मिळत आहे. चालू तिमाहीत हा व्याजदर 8.5 टक्के इतका आहे.
ईपीएफ
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असलेला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) हा बचत गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरू शकतो. ईपीएफ खात्यावर मिळणारे व्याजदर हे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रं, किसान विकास पत्रं, पीपीएफ आणि छोट्या बचत योजनांवरील व्याजदरांपेक्षा जास्त आहे. सध्या या गुंतवणुकीवर 8.65 टक्के इतके व्याज मिळत आहे.

अभिप्राय द्या!