आपल्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आर्थिक तजवीज करणे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी, करिअरसाठी आजकाल बरेच पैसे मोजावे लागतात. यासाठी योग्य वेळी गुंतवणुकीला सुरवात करणे खूप महत्त्वाचे असते. पैशाला नीट समजून न घेतल्यामुळे अथवा योग्य प्रमाणात अर्थसाक्षरता नसल्याने आयुष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचा परिणाम आपल्या पाल्यांच्या भविष्यावर होऊ नये, असे वाटत असेल; तर आपण वेळीच पावले उचलायला हवीत.
भविष्यात भांडवलवृद्धी आणि भांडवलसुरक्षा यांचा समतोल साधण्यासाठी म्युच्युअल फंडात मुलांच्या नावे “सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. याद्वारे मुलांना दीर्घकालीन गुंतवणुकीचे रहस्यही आपण उलगडून दाखवू शकतो. “एसआयपी’द्वारे बाजारातील चढ-उतार आणि महागाईवर मात करता येऊ शकते आणि भविष्यात आपली उद्दिष्टपूर्ती होऊ शकते.