‘पंचेचाळीसाव्या वर्षी नोकरी सोडून, वी वॉन्ट टू लिव्ह ऑन अवर ओन टर्म्स .’ असे म्हणणे ही आजच्या तरुण पिढीची क्रेझच बनली आहे.

मात्र हा निर्णय आर्थिक नियोजन तज्ज्ञाकडून तपासून घेणे आवश्यक आहे.

समजा, तुमचे आजचे वय ३० वर्षे आहे. तुमचा मासिक खर्च ५० हजार रुपये आहे. तुम्ही ४० व्या वर्षी निवृत्त होऊ इच्छिता. तुमचे अपेक्षित आयुर्मान १०० वर्षे आहे. महागाईचा दर पाच टक्के आणि गुंतवणुकीवर परतावा आठ टक्के धरल्यास तुमचा १० वर्षांनंतर मासिक खर्च ८१,५०० रुपये होईल. हा खर्च तुमच्या वयाच्या शंभराव्या वर्षांपर्यंत वाढत जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला निवृत्तीनिधी रुपये २.८७ कोटी रुपयांचा लागेल. हा निधी चालू १० वर्षांत जमा करण्यासाठी ८ टक्के परतावा दर जमेस धरल्यास, दरमहा १,५८,००० रुपये ‘एसआयपी’मध्ये गुंतवावे लागतील.

हेच निवृत्तीचे वय पाच वर्षांनी पुढे ढकलल्यास बाकी सर्व कंडिशन्स त्याच राहिल्यास तुम्हाला निवृत्तीनिधी ३.५४ कोटी रुपये लागेल आणि हा निधी १५ वर्षांत उभा करण्यासाठी १,०४,००० रुपये ‘एसआयपी’ करावी लागेल.

एवढी तयारी नसेल किंवा उत्पन्न नसेल तर early retirement शक्य नसते हे संबंधित सर्वांनी ध्यानी घेणे अत्याश्यक आहे !!

तरीही हा निर्णय घेण्यापूर्वी खालील बाबींचा विचार केला जायला हवा.

१) कर्जाचे हप्ते : घराचे कर्ज साधारणपणे वयाच्या चाळीस- पंचेचाळीसाव्या वर्षांपर्यंत चालू असते. एक कर्ज संपते तोवर जागा लहान पडू लागते. मोठी जागा घेण्यासाठी आधीचे घर विकून नवीन कर्ज काढले जाते. याच्या जोडीने वाहन कर्ज असते. निवृत्त होण्यापूर्वी सर्व कर्ज फेडली जाणे गरजेचे आहे.

२) इतर जबाबदाऱ्या : मुलांचे शिक्षण, लग्न यासाठी योग्य तरतूद असणे गरजेचे आहे.

३) मेडिक्लेम : वाढत्या वयात वैद्यकीय खर्च वाढत जातात. असे म्हटले जाते की वैद्यकीय क्षेत्रात महागाई दरवर्षी १५-२० टक्क्यांनी वाढते. त्यानुसार मोठय़ा रकमेचा आरोग्य विमा आवश्यक आहे.

४) जीवनशैलीतील बदल : आपल्या एकूण खर्चापैकी मोठा खर्च हा आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असतो. जीवनावश्यक गरजांसाठी फार कमी पसा लागतो. निवृत्तीनंतर आपल्या जीवनशैलीत बदल करून खर्च कमी करावा लागतो.

आयुष्यात शेवटी आनंद व  समाधान महत्त्वाचे आहेच. पण आर्थिक सुबत्ता नसेल तर ते समाधान लटके पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेऊनच असा निर्णय घ्यावा असे वाटते !!

अभिप्राय द्या!