गुंतवणूकदारांचे हितसंबंध जपण्यासाठी शेअर बाजार नियामक संस्था सेबी अनेक महत्वाचे निर्णय घेत असते. याचाच भाग म्हणून शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपनीविरोधात व्हिसलब्लोअरकडून (जागल्या) होणाऱ्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी सेबी एका विशेष एजन्सीची नेमणूक करणार आहे.
ही एजन्सी व्हिसलब्लोअरने केलेल्या तक्रारींची नोंद करणे, इलेक्ट्रॉनिक किंवा हस्तलिखित आलेल्या तक्रारींचे वर्गीकरण करणे, त्या तक्रारींचा पाठपुरावा करणे तसेच तक्रारींवर झालेल्या कारवाईचे अहवाल (एटीआर) तयार करणे व सेबीच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर तक्रारींची स्थिती अद्ययावत करणे यांसारख्या गोष्टी हाताळणार आहे.
अनेक व्हिसलब्लोअर कंपन्यांच्या कामकाजाविषयी नियामक संस्था सेबीकडे तक्रर करत असतात. प्रामुख्याने कंपन्यांमध्ये होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहार / गडबडींबाबत अनेक वेळा स्वतःची ओळख लपवून या प्रकारच्या तक्रारी केल्या जातात. नुकतेच इन्फोसिसच्या सीईओ आणि सीएफओनी चुकीच्या पद्धतीने आथिर्क अहवालातील आकडेवारी सादर केल्याचा आरोप कंपनीतीलच कर्मचाऱ्यांनी (व्हिसलब्लोअरने) केला होता. त्यानंतर या तक्रारीची दाखल घेऊन सेबी तसेच अमेरिकन स्टॉक एक्सचेंज कमिशनने देखील या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. त्याचबरोबर, आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर यांना देखील व्हिसलब्लोअरने केलेल्या तक्रारीनंतर आपली नोकरी गमवावी लागली होती.

 

अभिप्राय द्या!