आपले उत्पन्न व खर्च यावर अवलंबून असते तीच आपली जीवनशैली असे सर्वसाधारणतः म्हटले जाते.

माणूस किंवा कुटुंब कितीही मिळवते असले तरी त्यांचे खर्च उत्पन्न नुसार वाढतेच असतात. काहीजण आपले खर्च कसेही करतात व राहिली शिल्लक तर त्याला बचत संबोधून त्याची आवश्यकतेनुसार गुंतवणूक करतात.

बचत वाढवण्याचा एक सोपा उपाय सांगतो, दर महिन्याला आपण करीत असलेले खर्च विभागणीवार लिहावेत. म्हणजेच किराणा/घरखर्च/गाडीखर्च/विमा हप्ते/आवर्त ठेवी/मुलांचे शिक्षण/वीज बिल/पाणी बिल अशा स्वरूपात त्याची विभागणी करावी. हल्ली स्मार्ट फोनमध्ये ही विभागणी करून खर्च लिहिण्यासाठी अॅप्स सुध्दा उपलब्ध आहेत. दोन ते तीन महिने जसे आहे तसे खर्च लिहिल्यास आपण या सर्व खर्चाच्या विभागणीचा आढावा घेऊ शकतो.

गाडीचा खर्च जास्त आहे का? व का?

किराणा खर्च का जास्त होतो?    याचा विचार करून आपणच आपल्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणू शकतो.

कसे ?

१) मुलांना शाळेत सोडणे व बाजार रहाट करणे एकाच खेपेत होईल का हे पाहून पेट्रोल खर्चाची बचत शक्य आहे.

2) विद्युत उपकरणे घेताना स्वस्त किमतीची न घेता ” ५ स्टार “रेटिंगची घेतल्यास विजबचत शक्य असते.

3)” पाणी” रिसायकल करून कारवॉशसाठी वापरणे शक्य आहे.

4) ऑटो स्टॉपर नळाला बसविल्यास “पाणी” कमी वापरणे शक्य असते.

५) स्मार्ट फोनमध्ये अनावश्यक अॅप न घेतल्यास त्याचे आयुष्य वाढू शकते.

व या होणाऱ्या बचतीचा वापर आपण संपत्तीनिर्मीतीत करू शकतो हे निश्चित आहे.

उत्पन्नातून प्रथम बचत करून खर्चाचे नियंत्रण करणे महत्वाचे. पण काहीजण खर्च करून राहील ती बचत असे समजतात. कर्त्या व्यक्तीच्या सुरवातीच्या काळात बचत अधिक करणे शक्य असते पण वाढत्या वयाबरोबर मुलांचे शिक्षण, आरोग्य, यांचे खर्च वाढते असल्याने बचत कमी होते. पण शिक्षण/आरोग्य/मुलीचे लग्न यासाठी सुरुवातीच्या काळात नियोजनबद्ध गुंतवणूक केल्यास हे खर्च सहज करता येणे शक्य असते व यासाठी अर्थसल्लागाराचा सल्ला घेणेही केव्हाही उचित असते.

बरेच लोक अजूनही करसवलतीसाठी NSC/PPF/जीवन विमा या पर्यायांपलीकडे जाताना दिसत नाहीत. तसेच मुलीच्या लग्नासाठी व शिक्षणासाठी “सुकन्या समृध्दी योजने सारख्या” योजनांचा लाभ घेताना फार कमी पालक दिसतात. स्वतः, घर/गाडी यासाठी कर्ज घेतले असल्यास. “Term Plan” चा विचारसुध्दा केला जात नाही.

Equity फंडामधील SIP द्वारे गुंतवणूकीतून आपण भरघोस फायदा घेऊन आपल्या गरजा अत्यंत चांगल्या प्रकारे पुऱ्या करू शकतो, तसेच आपल्या निवृत्तीसाठी सुद्धा Tax बचत व वृद्धी असा संगम असलेली योजना गुंतवणूक सल्लागारामार्फत स्विकारल्यास आपला दुहेरी फायदा निश्चीतच असतो हे लक्षात घेणे अत्यावशक आहे.

पहाट होताच पक्षी चिवचिवाट करत अन्न शोधासाठी बाहेर पडतात याचे कारण जवळच असलेले किडे/प्राणी आपल्याला कमी त्रासात मिळावेत हाच हेतू असतो. त्याप्रमाणे आपण वृध्दापकाळ सुखासमाधानात घालवण्यासाठी जीवनशैलीचा विचार करून बचतीतून गुंतवणूक सुरु करण्याचा टप्पा गाठणे महत्वाचे असते.

अभिप्राय द्या!