भारतातील आघाडीची सोने तारण कंपनी मुथूट फायनान्स लिमिटेड आता म्युच्युअल फंड क्षेत्रात पदार्पण करत आहे. कंपनी लवकरच आयडीबीआय म्युच्युअल फंडाचा (एएमसी) संपूर्ण व्यवसाय विकत घेणार आहे. सेबीच्या परवानगीनंतर 215 कोटी रुपयांना हा व्यवहार पूर्ण होईल. यानंतर आयडीबीआयची संपूर्ण मालकी मुथूट फायनान्सकडे येणार आहे. फेब्रुवारी 2020 पर्यंत हा व्यवहार पूर्णत्वास जाईल असा कंपनीचा प्रयत्न असल्याचे मुथूट फायनान्सने म्हटले आहे.
आयडीबीआय बँकेने 2010 साली आयडीबीआय म्युच्युअल फंडाला सुरुवात केली होती. सद्यस्थिती आयडीबीआय म्युच्युअल फंडाकडे 5,300 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असून कंपनी नफ्यात व्यवसाय करत आहे. आयडीबीआय एएमसीच्या 22 योजना सद्यस्थितीत कार्यरत आहेत.
मागील वर्षांपासून म्युच्युअल फंड क्षेत्रात येण्यासाठी मुथूट फायनान्स प्रयत्नशील होती. सध्या कंपनी फंड वितरणाचं काम पाहत आहेत.
सेबीच्या नियमानुसार म्युच्युअल फंड व्यवसायात येण्यासाठी कुठल्याही संस्थेला कमीत कमी 5 वर्षांचा वित्तीय क्षेत्राचा अनुभव असणं बंधनकारक आहे.  सध्या भारतात 48 म्युच्युअल फंड कंपन्या या क्षेत्रात कार्यरत आहेत.

 

अभिप्राय द्या!