अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलूनसुद्धा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत देशाचा विकासदर घसरून 4.5 टक्क्यांवर आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने यासंदर्भातील आकडेवारी आज (शुक्रवारी) जाहीर केली आहे. 
 
जून महिन्यात देशाची जीडीपी वाढ घसरून 5 टक्क्यांवर आल्यानंतर परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या तिमाहीत विकासदर आणखी घसरत 4.5 टक्क्यांवर आला आहे. याआधी 2013-14 या आर्थिक वर्षात मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत विकासदर 4.3 टक्क्यांपर्यत घसरला होता. मागील सलग सहा तिमाहींपासून देशाच्या जीडीपीमध्ये सातत्याने घसरण होते आहे. याआधी विकासदरातील वाढ मार्च 2019 अखेर नोंदवली गेली आहे. त्यावेळेस जीडीपीचा विकासदर 8.13 टक्के इतका होता. 
 
देशाच्या जीडीपीच्या विकासदराचा अंदाज तज्ज्ञांनी याआधीच काही आठवड्यांपूर्वी व्यक्त केला होता. त्यावेळेस त्यांनी अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणखी गंभीर होण्याबद्दल सूतोवाच केले होते. आयसीआरएच्या ऑक्टोबर महिन्यासाठीच्या आर्थिक पुनरावलोकनात 18 महत्त्वाच्या आर्थिक घटकांपैकी सात घटक वाईट स्थितीत असल्याचे म्हटले होते. 

अभिप्राय द्या!

Close Menu