म्युच्युअल फंडांची हायब्रीड श्रेणी म्हणजे इक्विटी सेव्हिंग्ज फंड. या फंडात जोखमीचे प्रमाण कमी असते… याचे कारण म्हणजे त्यात विविध प्रकारच्या समभागांचा असणारा समावेश. यातील निधी वैविध्यपूर्ण इक्विटी स्टॉक, डेट आणि आर्ब्रिट्रेजमध्ये गुंतवला जातो. यातील नेट लाँग इक्विटीमुळे मूळ गुंतवणुकीचे मूल्य वाढण्यास मदत होते. तर, आर्ब्रिट्रेज आणि डेट सेक्युरिटिजमुळे परताव्यांमध्ये स्थैर्य येते.
फंडाची रचना
इक्विटी सेव्हिंग्ज फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ६५ ते ९० टक्के इक्विटीचे प्रमाण असते. या इक्विटीपैकी २५ ते ७५ टक्के हिस्सा हा आर्ब्रिट्रेजचा असू शकतो. तसेच, यातील डेट आणि मनी मार्केटचा हिस्सा हा १० ते ३५ टक्के असतो. संबंधित योजनेचा फंड मॅनजरचा इक्विटीवर अधिक भरवसा असेल तर, त्यामध्ये त्या प्रमाणात इक्विटीचा हिस्सा असतो. सरासरीचा विचार केला तर, यामध्ये इक्विटीचे प्रमाण २० ते ३५ टक्के असते. इक्विटीची गुंतवणूक ही लार्ज कॅपमध्ये केली जाते. यातील डेट गुंतवणुकीसाठी ‘ट्रीपल ए’ श्रेणीचे पेपर निवडले जातात. अथवा कमी कालावधीच्या सरकारी सेक्युरिटीजच्या पर्यायाचाही विचार केला जातो.
इक्विटीचा दर्जा
या पोर्टफोलिओमधील निधी विशिष्ट प्रमाणात इक्विटीसाठी राखून ठेवला जातो. त्यामुळे आर्ब्रिट्रेजचे प्रमाण नेहमी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक रहाते. या वाटपामुळे या फंडाचा नेहमीच इक्विटी म्युच्युअल फंडात समावेश होतो आणि इक्विटीला लागू असणाऱ्या करआकारणीचे लाभ या फंडास मिळतात. यानुसार गुंतवणूकदारास १५ टक्के अल्पकालीन भांडवली नफा कर व १० टक्के दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू होतो.
चांगला परतावा
गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीचा विचार केला तर या फंडांतून सरासरी ७.०५ टक्के परतावा मिळाल्याचे दिसते. इक्विटीमध्ये प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी या प्रकारच्या फंडांपासून गुंतवणुकीस सुरुवात करावी. इक्विटीमध्ये अल्पकाळ गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठीही या फंडांचा पर्याय चांगला आहे. एक ते तीन वर्षे गुंतवणूक करून इक्विटीच्या कररचनेचे लाभ घेऊ पहाणाऱ्यांना गुंतवणूकदारांसाठीही हा फंड योग्य ठरतो.