मागील दीड वर्ष मिडकॅप गुंतवणूकदारांसाठी वावटळीचे वर्ष ठरले.

५ जानेवारी २०१८ रोजी गाठलेल्या शिखरानंतर मिडकॅप निर्देशांकाचा माघारी प्रवास सुरू झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी हे लार्जकॅप निर्देशांक नवीन शिखरे पादाक्रांत करीत असताना एस अँड पी बीएसई मिडकॅप निर्देशांकांचा मागील २३ महिन्यांतील प्रवास नकारात्मक राहिल्याने गुंतवणूकदारांची मिडकॅपकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अजून सकारात्मकतेचा अभाव दिसून येत आहे. मिडकॅप समभागांच्या सध्याच्या किमतीचा विचार केला तर पाच पैकी तीन समभागांच्या किमती त्यांच्या ऐतिहासिक शिखरापासून अजून किमान १७ ते २० टक्के खाली आहेत. जोखीम घेण्याची मानसिकता आणि नकारात्मक परतावा दिसला तरी किमान पाच वर्षे गुंतवणुकीशी वचनबद्धता राखल्यास ही घसरण संपत्ती निर्मितीची एक संधी आहे. मिडकॅप समभागातील अस्थिरतेवर मात करण्यासाठी मिडकॅप फंडांत पद्धतशीर गुंतवणुकीद्वारे (एसआयपी) गुंतवणूकदारांना संपत्ती निर्मितीच्या ज्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधींचे सोने करण्याची क्षमता असलेला निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड हा एक फंड आहे.

मागील ऑक्टोबर महिन्यात निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने २५व्या वर्षांत पदार्पण केले असून २२व्या वर्षांत या फंडाच्या ‘ग्रोथ’ पर्यायाच्या ‘एनएव्ही’ने चार आकडी संख्या गाठली आहे. भारतीय म्युच्युअल फंडांच्या इतिहासात चार आकडी एनएव्ही गाठणारा हा एकमेव फंड आहे. फंडाच्या पहिल्या एनएव्हीप्रमाणे ८ ऑक्टोबर १९९५ रोजी गुंतविलेल्या एक लाखाचे शुक्रवार, २९ नोव्हेंबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.१२ कोटी रुपये झाले असून वार्षिक परताव्याचा दर २१.६ टक्के आहे. मिडकॅप फंड प्रकारात निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड दीर्घ मुदतीत चांगली कामगिरी करणारा फंड आहे.

अभिप्राय द्या!