म्युच्युअल फंडांसाठी रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) आणि नॅशनल पेन्शन योजनेसाठी (एनपीएस) सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी (सीआरए) म्हणून कार्यरत असलेल्या कार्व्ही फिनटेकने कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग फर्मपासून स्वतःला दूर करत आपल्या कंपनीचे नाव ‘के फिनटेक’ असे केले आहे. कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगची मालकी असलेल्या ‘कार्व्ही फिनटेक’ कंपनीला प्रायव्हेट इक्विटी फर्म जनरल अटलांटिक या अमेरिकास्थित कंपनीने मागील वर्षी विकत घेतले आहे. त्यामुळे  कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगवर झालेल्या कारवाईनंतर कार्व्ही फिनटेकने स्वतःला दूर ठेवण्यासाठी आणि ब्रँडवर परिणाम होऊ नये म्हणून आपल्या कंपनीचे नाव बदलले आहे.
कार्व्ही फिनटेक सध्या बीएनपी परिबास म्युच्युअल फंड, कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड आणि मिराएसेट म्युच्युअल फंडासह 23 वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांसाठी आरटीए म्हणून काम पाहत आहे.
ग्राहकांच्या परवानगीशिवाय शेअर्सची विक्रीकरून ते पैसे रियल इस्टेट कंपनीत गुंतवल्याचे आढळून आल्याने नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजने कार्व्हीचा ब्रोकिंग फर्मचा परवाना रद्द केला आहे. या कारवाईनंतर कार्व्हीचे ग्रुप अध्यक्ष आणि एमडी सी पार्थसरथी यांनी कार्व्ही फिनटेक संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. तसेच कंपनीने त्यांच्या जागी एम. व्ही. नायर यांची केफिनटेकच्या संचालक मंडळावर नॉन-एक्झिक्युटिव्ह अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. नायर हे ट्रान्सयूनीयन सिबिल या कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच काही खासगी इक्विटी कंपन्यांचे सल्लागारही आहेत.

 

अभिप्राय द्या!