युलिप सारख्या बाजाराशी संबंधित विमा योजना विकताना विमा एजंटांकडे प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे. भांडवली बाजारात अनेक घडामोडी होत असतात. अशावेळी विमा एजंटला युलिपची संकल्पना, भांडवली बाजारासंबंधित मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. जेणेकरून विमा घेणाऱ्या ग्राहकांना ही माहिती देताना एजंट्सना अडचण येणार नाही. अनेक विमा एजंट या माहितीशिवाय या प्रकारच्या योजना विकत असतात. परिणामी ग्राहकांची फसवणूक होते. हे टाळण्यासाठी आयआरडीएने हे पाऊल उचलले आहे.
हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एजंट किंवा मध्यस्थ कंपन्यांना विशेष प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. त्यानंतरही संबंधित कंपनीचे अधिकृत प्रमाणपत्र नसल्यास विमा एजंटांना या योजना विकता येणार नाहीत. त्याचबरोबर युलिप किंवा भांडवली बाजारासंबंधित योजना विकताना ग्राहकांना म्युच्युअल फंड किंवा इतर पर्यायांची देखील माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.