मागील ऑक्टोबर महिन्यात निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने २५व्या वर्षांत पदार्पण केले असून २२व्या वर्षांत या फंडाच्या ‘ग्रोथ’ पर्यायाच्या ‘एनएव्ही’ने चार आकडी संख्या गाठली आहे.

फंडाच्या पहिल्या एनएव्हीप्रमाणे ८ ऑक्टोबर १९९५ रोजी गुंतविलेल्या एक लाखाचे शुक्रवार, २९ नोव्हेंबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.१२ कोटी रुपये झाले असून वार्षिक परताव्याचा दर २१.६ टक्के आहे. मिडकॅप फंड प्रकारात निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड दीर्घ मुदतीत चांगली कामगिरी करणारा फंड आहे. मूळ मल्टिकॅप प्रकारच्या या फंडाचे सेबीच्या प्रमाणीकरणानंतर, फंड घराण्याने मिडकॅप प्रकारात वर्गीकरण केले.  मनीष गुनवाणी आणि धृमील शहा हे या फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक आहेत.

या फंडाची अस्थिरतादेखील त्या फंड गटातील सरासरीपेक्षा कमी आहे. तसेच या फंडाचा जोखीम-समायोजित परतावा या फंडांना अव्वल तारांकन मिळविण्यास कारणीभूत ठरला तो मोठय़ा मालमत्तेमुळे. मोठय़ा मालमत्ता असलेल्या फंडांची कामगिरी त्यांच्या आकारामुळे बाधित झाली आहे असे अद्याप तरी  विधान केलेले नाही. गुंतवणुकीसाठी कायम खुले असलेले (ओपन-एंडेड) फंड अनेकदा खराब कामगिरी करणाऱ्या समभागातून वेळोवेळी बाहेर पडतात. फंडांचा आकार मालमत्ता व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण ठरवत असतो. फंड मालमत्ता जितकी अधिक तितका निधी व्यवस्थापन खर्च कमी असल्याने, ही गोष्ट गुंतवणूकदारांच्या पथ्यावर पडत असते.

बदलत्या परिस्थितीत या फंडाचा परतावा या फंडाने दिलेल्या दीर्घकालीन परताव्याइतका निश्चित नसेल तरी भविष्यात या फंडाचा दीर्घकालीन वार्षिक परतावा १० ते १२ टक्के नक्कीच मिळेल, अशी आशा बाळगायला वाव आहे.

अभिप्राय द्या!