कृषी विज्ञान क्षेत्रातील कंपनी, पीआय इंडस्ट्रीजने मागील 10 वर्षात गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. पीआय इंडस्ट्रीजने जवळपास 9,000 टक्क्यांचा परतावा मागील दशकभरात दिला आहे. 3 डिसेंबर 2009ला पीआय इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 16.46 रुपये प्रति शेअर इतकी होती. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाला त्यावेळेस राष्ट्रीय शेअर बाजारात पीआय इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 1487.55 रुपये प्रति शेअर इतकी होती.
2009 मध्ये जर पीआय इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असेल तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 90 लाख रुपयांवर पोचले आहे. काही दिवसांपूर्वीच पीआय इंडस्ट्रीजच्या शेअरने आतापर्यतची उचांकी पातळी गाठली होती. हा शेअर 1,529.95 रुपये प्रति शेअरवर पोचला होता. मागील वर्षी पीआय इंडस्ट्रीजच्या शेअरने 83.36 टक्क्यांचा परतावा दिला होता.

अभिप्राय द्या!